ह्रदयद्रावक ! अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप- लेकीचा मृत्यू
लोकगर्जना न्यूज
दुचाकीवरून मुलीला शाळेत सोडायला जात असलेल्या शिक्षकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लातूर शहराला लागून असलेल्या म्हाडा कॉलनी समोर आज सोमवारी सकाळी घडली आहे.
दत्तात्रय पांचाळ ( वय ३८ वर्ष ), प्रतिक्षा पांचाळ ( वय १३ वर्ष ) असे मयत बाप-लेकीचे नावं आहेत. दत्तात्रय पांचाळ हे भूसणी ( ता. लातूर ) येथील मुळचे रहिवासी असून ते वास्तव्यास ही भूसणी आपल्या गावीच आहेत. परंतु मुलगी प्रतिक्षा ही लातूर येथील ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे. तसेच पांचाळ हे जिल्हा परिषदेत शिक्षक असून पानचिंचोली येथील शाळेवर कार्यरत होते. दत्तात्रय पांचाळ हे दररोज गावाकडून मुलीला दुचाकीवरून शाळेत सोडत असे, त्यानंतर आपल्या शाळेवर जाऊन सेवा बजावत असत. आजही ते नेहमी प्रमाणे मुलीला घेऊन लातूरला निघाले होते. शहराच्या लगत असलेल्या म्हाडा कॉलनी जवळ आलेले असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर मार लागल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावर गुन्हा नोंद झाला आहे.