हृदयद्रावक! सफरचंद खाण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा मृत्यूने घास केला
धारुर तालुक्यातील वाघोली येथील घटना
लोकगर्जना न्यूज
धारुर : तालुक्यातील वाघोली येथील ६ वर्षाचा चिमुकला घरातील कपाटात ठेवलेले सफरचंद घेण्यासाठी गेला. यावेळी कपाटाच्या खाली लपलेल्या विषारी सापाने दंश केला. काहीतरी चावलं म्हणून आईला सांगितले. चिमुकल्यास तातडीने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान आज मंगळवारी पहाटे निधन झाले. या घटनेने वाघोली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आदित्य अप्पाराव गव्हाणे ( वय ६ वर्ष ) रा. वाघोली ( ता. धारुर ) असे मयत चिमुकल्याचं नाव आहे. रविवारी ( दि. २५ ) दुपारी तो घरातील कपाटात आणून ठेवलेले सफरचंद खाण्यासाठी गेला. त्याने कपाट उघडून सफरचंद घेतलं, यावेळी कपाटाच्या खाली लपलेल्या सापाने डाव्या पायाच्या पंजाला वरच्या बाजूने दंश केला. दंश करताच तो रडत बाहेर गेला व काहीतरी पायाला चावल व तो मऊ बेडका सारखं होतं असं म्हणाला. साप चावला असल्याची मनात पाल चुकचुकली अन् तातडीने त्यास अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर आज मंगळवारी ( दि. २७ ) संपली. आदित्यचा पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर सकाळी ९ वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबाचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. तर अचानक अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकल्याचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.