हृदयद्रावक बांधकाम मजूर चुलत्या-पुतण्याचा करंट लागून मृत्यू
लोकगर्जनान्यूज
गेवराई : बांधकामावर प्लास्टर करताना पुतण्याला करंट लागलेला पाहून त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या चुलत्यालाही करंट लागला व दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मन्यारवाडी ( ता. गेवराई ) येथे शनिवारी ( दि. २७ ) दुपारी घडली आहे. या घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेख फेरोज इस्माईल, शेख समीर जुबेर दोघे रा. संजय नगर गेवराई असे दोघे मयत चुलता – पुतण्याचे नाव आहे. हे दोघेही बांधकाम मिस्त्री असून, ते कबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे त्यांचे काम सुरू होतं. बांधकाम पुर्ण झाले असून आज प्लास्टर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी काम करत असताना वरुन गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिनीचा पुतण्या समीर यास प्रथम करंट लागला. हे लक्षात येताच चुलते फेरोज यांनी पुतण्याला वाचविण्यासाठी धाव घेऊन प्रयत्न केला. परंतु त्यांनाही करंट लागला आणि यामध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय, गेवराई येथे आणण्यात आले. ही बातमी गेवराई मध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने पाहणाऱ्यांची दवाखाना परिसरात गर्दी झाली होती. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.