हृदयद्रावक! गोदावरीत चौघांना जलसमाधी
दोघांना वाचवताना चौघेही बुडाले; रात्री ८ पर्यंत तीन मृतदेह

लोकगर्जनान्यूज
बीड : देवदर्शनाला जाताना रस्त्यात अंघोळीसाठी गोदावरी पात्रात उतरले होते. यावेळी दोघे बुडत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी तिघांनी प्रयत्न केले. त्यांच्या सह वाचविणारे दोघे असे चौघे बुडून जलसमाधी मिळाली. एकजण वाचला असून शनिवारी रात्री ८ पर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले चौथ्याचा शोध सुरू होता. सदरील घटना शनिवारी ( दि. ११ ) दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास नेवासा जवळ प्रवरा संगम येथे घडली.
बाबासाहेब अशोक गोरे ( वय ३१ वर्ष ), आकाश भगीरथ गोरे ( २० वर्ष ), नागेश दिलीप गोरे ( १९ वर्ष ), शंकर परसनाथ घोडके ( वय २५ वर्ष ) सर्व रा. पालखेड ( ता. वैजापूर ) अशी मयतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे चौघे आणि आणखी एक असे पाचजण पालखेड येथून अहमदनगर जिल्ह्यातील मढी ( ता. पाथर्डी ) येथे दर्शनासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान ते प्रवरा संगम ( नेवासा ) येथे आले असता ते आंघोळीसाठी गोदावरी नदी पात्रात उतरले होते. यातील दोघांना पोहता येत नव्हते पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी तिघांनी प्रयत्न केले. वाचविणारे दोघेही अन् ते दोघे असे चौघे बुडाले. एकजण वाचला. त्याने बाहेर येऊन आरडाओरडा केली. स्थानिका नागरिकांनी धाव घेऊन प्रयत्न केले परंतु यश आले नाही. घटनास्थळी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करत तिघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले. चौथा मृतदेह रात्री ८ वाजेपर्यंत हाती लागला नव्हता. अहमदनगर येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.