हृदयद्रावक: अपघाताने केला वडीलांचा घात मुलाचा तोंड पहाण्याची इच्छा राहून गेली
लोकगर्जनान्यूज
आष्टी : मुलगा झाल्याची आनंदाची बातमी समजली परंतु कामामुळे तोंड पहाता आले नाही. दोन महिन्यांनंतर मुलाला पहाण्यासाठी निघालेल्या वडीलांचा अपघात झाला. यामध्ये मृत्यू झाल्याने मुलाला पहाण्याची बापाची इच्छा अपुरी राहिल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आल्याने आष्टी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मयत युवराज पोपट जगताप ( वय ३४ वर्ष ) रा. पाटण सांगवी ( ता. आष्टी ) हे शेगाव तालुक्यातील भेंडा सहकारी साखर कारखाना येथे हमाली करतात. या कामानिमित्त ते भेंडा कारखाना येथेच कुटुंबासह वास्तव्यास होते. पत्नीला प्रसुतीसाठी गावाकडे पाठवलं होतं. दोन महिन्यांपूर्वी त्यांना गोंडस मुलगा झाला. ही आनंद वार्ता समजली परंतु कामामुळे मुलाला पहाण्यासाठी येता आले नाही. दोन महिन्यांनंतर वेळ मिळाल्याने युवराज जगताप हे दुचाकी क्र. एम.एच. १२ डी.के.३५६६ यावरुन मुलाला पहाण्यासाठी गावाकडे निघाले दरम्यान ते पैठण-बारामती रस्त्यावर चितळवाडी ( ता. पाथर्डी ) जवळ आले असता एका वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाखाली जाऊन पडून घडलेल्या अपघातात जबर मार लागून युवराज जगताप यांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी ( दि. २३ ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाला पहाण्यासाठी निघालेल्या बापाचा अपघाताने घात केल्याने मुलाला पहाण्याची बापाची इच्छा अपूर्ण राहिली आहे.