स्प्रिंक्लर सुरु करायला गेला अन्… शेतकरी मोठ्याने रडायला लागला; नेमकं काय घडलं?
लोकगर्जनान्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथे एक शेतकरी पीक सुकत असल्याने पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लर सुरु करण्यासाठी शेतात गेला. पंप सुरू केला पण पाणीच येत नसल्याने काय झाले म्हणून पहाण्यासाठी गेला अन् त्याने मोठ्याने रडायला सुरुवात केली. शेजारी धावत आले व तेही समोरील चित्र पाहून त्यांनाही राग आला परंतु त्यांनी रडत असलेल्या शेतकऱ्याला धीर देत शांत केले. नेमकं असं काय घडलं यासाठी पुर्ण बातमी वाचा.
शिवाजी महादेव लगसकर ( वय 42 वर्ष ) रा. आडस ( ता. केज ) हा एक सामान्य शेतकरी, मेंढपाळ करुन त्या माध्यमातून पैसा जोडून व सर्व जित्राब ( मेंढ्या ) विकून शेतात विहीर खोदली पाणीही चांगले लागले. आता मेंढ्या सांभाळायच्या नाही फक्त शेती करायची म्हणून पिकाला पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लर सेट ( संच ) खरेदी केला. एकूण 35 पाईप व त्यासाठी लागणारे स्प्रिंक्लर सर्व साहित्य घेतलं. सध्या पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन सुकत असल्याने पाणी देण्यासाठी शेतात स्प्रिंक्लर सेट लावून ठेवला. रात्री 12 वाजता शेतातील वीजपुरवठा सुरु होणार होता त्यामुळे घरी येऊन आराम केला. 12 वाजता तो शेतात गेला. विहिरीवरील पंप सुरू केला. पण स्प्रिंक्लरला पाणीच येईना, मग काय झाले म्हणून जाऊन पाहिले असता कोणीतरी अज्ञात विघ्न संतोषी व्यक्तीने कुऱ्हाडीने मारुन सर्वच्या सर्व स्प्रिंक्लरचे पाईप फोडले असल्याचे दिसून आले. सुकत असलेले पीक अन् हा खोडसाळ पणा पाहून या सामान्य शेतकऱ्याने हंबरडा फोडला. मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आल्याने पाणी देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी शिवाजी लगसकरच्या दिशेने धाव घेतली. काय झालं? म्हणत पाईप फोडल्याचे पाहून त्यांनाही राग आला. परंतु शिवाजी यांना शांत करत त्यांनी धीर दिला. परंतु पीक जळून जाणार मी काय करू म्हणत शेतकरी शिवाजी हाताश होऊन बोलत होते. या प्रकरणी शिवाजी लगसकर यांनी आडस पोलीस चौकीत तक्रार दिली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आता पाईप फोडण्याऱ्या त्या विघ्न संतोषीचा शोध लागेल का? याकडे लक्ष लागले आहे. ही माहिती गावात पसरताच पाईप फोडून त्याला काय मिळाले? असं म्हणत संताप व्यक्त केला जात आहे.