सोशल मीडिया ट्रेंड नंतर माजी मंत्री मुंडे, आ. पवार व मुंदडांकडून २५ % ॲग्रीमची मागणी
लोकगर्जना न्यूज
बीड : पीक विमा कंपनीच्या हेकेखोर पणामुळे जिल्ह्यातील अवघ्या १६ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ % ॲग्रीम मिळणार आहे. ही बातमी बाहेर पडताच शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला. यावर जिल्ह्यातील एकाही पुढाऱ्याने चकार शब्द काढला नाही. शेतकऱ्यांसाठी सोशल मीडिया ट्रेंडची हाक दिली यास मोठा प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर अक्षरशः शासन, प्रशासन व पुढाऱ्यां विरोधातील पोस्टचा महापूर आला. यानंतर सर्वांना खडबडून जाग आली. आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना तर आमदार लक्ष्मण पवार आणि नंदकिशोर मुंदडा यांनी सर्वांना सरसकट २५ % ॲग्रीम देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.
ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे फुलात व पापडी अवस्थेत शेंग असल्याने पावसाविना सोयाबीनची फुल व शेंग गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच हलक्या जमिनीवर असलेली पीक तर पुर्णपणे करपून गेली आहेत. ही परिस्थिती पहाता उत्पादनात मोठी घट होणार आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली. याची दखल घेऊन बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी २५ % ॲग्रीम साठी रॅंडम सर्वे करण्याचे आदेश दिले. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले. याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. परंतु विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यास विरोध केला. त्यामुळे जिल्ह्यातील ६३ महसूल मंडळ पैकी अवघ्या १६ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ % ॲग्रीम मिळणार आहे. आज मंगळवारी ( दि. १३ ) जिल्हाधिकारी यांची विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. यात काय होणार याकडे ही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुर्ण जिल्ह्यात नुकसान झाले आहे परंतु विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे ७० % शेतकरी २५ % ॲग्रीम पासून वंचित राहणार आहेत. मात्र जिल्ह्यातील एकही पुढारी यावर बोलण्यासाठी पुढे आला नाही. परंतु शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर सोमवारी ( दि. १२ ) सायंकाळी ट्रेंड आंदोलन राबविले यास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळेत सोशल मीडियावर शासन, प्रशासन, पुढारी यांच्या विरोधात अक्षरशः पोस्टचा महापूर आला. याचा परिणाम आज मंगळवारी ( दि. १३ ) दिसून आला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सरसकट शेतकऱ्यांना २५ % ॲग्रीम देण्याची मागणी केली. तसेच गरज पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर गेवराई मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी ही सरसकट २५ % ॲग्रीम वाटप करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता काय निर्णय होणार? याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.