सोयाबीन पीक सर्वच घेतात पण या शेतकऱ्याची का होतेय चर्चा? वाचा भन्नाट प्रयोग
सोयाबीन आत्ताशी उगवत असताना आडस ( ता. केज ) येथील एका शेतकऱ्याने भन्नाट प्रयोग केला. सध्या त्यांच सोयाबीन एक ते सव्वा फूट उंच असून परिसरात याच शेतकऱ्याची चर्चा सुरू आहे. अनेकजण या प्लॉटला भेट देऊन पाहणी करत आहेत.
केज तालुक्यातील आडस येथील रमेश प्रकाश शेंडगे हे वकील असून, त्यांना ८ हेक्टर २० आर इतकी शेती आहे. ते वकीली व्यवसाय सांभाळून एक सालगडी ठेवून शेती करतात. यावर्षी त्यांनी सोयाबीन लागवडीचा वेगळाच प्रयोग केला. तो खूप यशस्वी झाला आहे. यंदा सर्व पेरण्या या आडस परिसरात २५ जून च्या नंतर झाल्या आहेत. परंतु रमेश शेंडगे यांनी ७ जूनला ६ एक्कर ३० गुंठे क्षेत्रावर बेड पद्धतीने सोयाबीन लागवड केली. पाऊस नसतानाही लागवड केलेली सोयाबीन १०० टक्के उगवण झाली आहे. यासाठी त्यांनी लागवड करण्या अगोदर बेड ( सरी वरंबा ) पद्धतीने पावनेचार फुटांवर सोयाबीन लागवड केली. यासाठी लागवडी आगोदर स्प्रिंक्लरच्या सहायाने आठ तास पाणी दिले. यानंतर बेडवर कापसा प्रमाने सोयाबीन लागवड केली. लागवडी नंतर स्प्रिंकलरनेच दोन तास पाणी दिले. इतक्याच पाण्यावर सोयाबीन १०० टक्के उगवलं अशी माहिती दिली. लागवडीनंतर एकदाच पाणी दिले त्यानंतर थोडं फार पाऊस झाला त्यावरच पीक बहरले. २५ जूनच्या नंतर पेरणी झाल्याने कोणाचे पीक दोन पानावर अथवा चार पानावर आहे. रमेश यांचे सोयाबीन एक ते सव्वा फूट उंच झाले आहे. येत्या पंधरा दिवसांत त्यास फुले लागण्यास सुरुवात होईल असे सांगितले. बेड पद्धतीने सोयाबीन लागवड केली तर उत्पन्नात २५ ते ३० टक्के वाढ होते असा दावा करुन यामुळे फवारणी व अंतर मशागत करण्यासही सुलभता आहे. पाणी देण्याची गरज असेल तर मध्ये ही जाण्याची गरज नसून, सापांची भीती नाही. यामुळेच मी बेड पद्धतीने सोयाबीन लागवड केली असल्याची माहिती दिली. सर्वात मोठा फायदा म्हणजे कीतीही पाऊस झाला तरी पिकाला पाणी लागून ते पिवळं पडण्याची भीती खूप कमी आहे. पारंपरिक पद्धतीने पेरणी केली असता उत्पन्न तर घटतेच परंतु त्यामध्ये फवारणी, पाणी देताना पाल्याच्या खाली दडून बसलेल्या सापांची अधिक भीती आहे. यासाठी घरातील केडीएस ७२६ वाणाचे बियाणे लागवड केली. तेही शंभर टक्के उगवून आले. त्यामुळे पेरणी पेक्षा लागवड केलेल्या बियाणांची उगवण क्षमता वाढते असे दिसून आले. पाऊस नसतानाही या शेतकऱ्याने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे दिसून येत आहे. या प्रयोगाची व प्लॉटची आडस परिसरात चर्चा सुरू आहे. हे पहाण्यासाठी अनेक शेतकरी शेंडगे यांच्या शेताला भेट देत असून, त्यांचे कौतुक करत आहेत.