सोयाबीन दर स्थिर … काय आहे कारण?
लोकगर्जना न्यूज
मागील पंधरा दिवसांपासून सोयाबीनचे दर ६ हजार ते ६ हजार २०० ते ३०० पर्यंत स्थिर दिसत आहेत. बाजारात सोयाबीनची आवक ही म्हणावी तशी जास्त नाही तरीही बाजारात भाव वाढत नाहीत. काही दिवसांपासून सोया पेंडचा उठाव कमी झाला आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. अचानक वाढते कोरोना रुग्ण यामुळेही बाजारावर काही प्रमाणात परिणाम झाला असून हे एक कारण असू शकते असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
मागील काही दिवसांपुर्वी सोयाबीनला वायदे बाजारातून वगळले आहे. याचा बाजारभावावर प्रभाव होता. वायदे बाजारातील विक्री तसेच बाजारातील मागणी, पुरवठा या नुसार भाव ठरतात. देशाचा विचार केला तर सध्या सोयाबीन भाव ५ हजार ९०० ते ६ हजार ३५० च्या दरम्यान दिसत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बाजारात दरदिवशी तेजी मंदी पाहायला मिळत होती. परंतु पंधरा दिवसांपासून भाव पुर्णपणे स्थिर राहिले आहे. शेतकरी भाव वाढण्याची वाट पाहत असून सोयाबीन घरातच साठवून ठेवलेले आहे. परंतु यावर्षी कापूस नसल्याने आणि सोयाबीन काढून जवळपास दोन महिने होत आहेत. त्यामुळे नड पडली तर शेतकरी टप्प्याटप्याने सोयाबीन विक्री करत असल्याने बाजारात आवकचाही दबाव नाही. सोयापेंडची मागणी सामान्य राहिल्याने सोयाबीन एका भावपातळीभोवती फिरत आहे. देशांतर्गत सोयापेंडचे दर अधिक असल्याने देशांतर्गत तसेच निर्यातीसाठीही मागणी सरासरी आहे. देशांतर्गत सोयापेंडची महिन्याला तीन ते साडेतीन लाख टनांपर्यंत गरज असते. सध्या बाजारात प्रतिदिन सरासरी अडीच लाख पोत्यांची आवक दिसत आहे. शेतकरी दररोज थोडी थोडी का होत नाही सोयाबीन विकत असल्याने बाजारावर आवकचाही दबाव नाही त्यामुळे भाव टिकून आहेत. महाराष्ट्र, राजस्थानमध्ये, छत्तीसगड येथील बाजारांचा विचार केला तर सर्व ठिकाणी ६ हजार ते ६ हजार ४०० असा दर असल्याचे दिसून आले. सोया पेंडचा विचार केला तर महाराष्ट्रात प्रतिटन ५३ हजार ते ५६ हजार रुपये भाव राहिला. मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता सोयापेंडचे भाव टिकून राहण्याची व्यापारी सूत्रांनी शक्यता व्यक्त केली. तसेच वाढता कोरोना संसर्ग पहाता यामुळे ही काही अडचणी येत असल्याने सोयाबीन भाव स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांनाही आता बाजाराचा अभ्यास होत असून दोन आठवडे झाले भाव स्थिर आहेत. तरीही शेतकरी शांतपणे याकडे पहात मालाचा साठा ठेवला असून, भाव वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे.