सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिसेंबर महिना ठरला निराशाजनक; तब्बल इतके उतरले दर

लोकगर्जनान्यूज
बीड : नोव्हेंबर महिन्यात सोयाबीन, कापसाच्या दरात चांगलीच वाढ झाली होती. वाढते दर पाहून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या परंतु डिसेंबर महिना सुरू होताच दर घसरण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात दर खाली आल्याने सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महिना निराशाजनक ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दर वाढतील की, नाही याबाबत खात्रीलायक कोणीही बोलत नसून जर तरचे अंदाज वर्तविण्यात येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची वर्षभराची मदार पुर्णपणे खरीप हंगामवर अवलंबून असते, परंतु यावर्षी खरीप हंगाम असमाधानकारक ठरले. पीक कोवळी असताना गोगलगायचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकाचे नुकसान झाले. यानंतर सोयाबीन फुले व पापडी शेंग अवस्थेत असताना तर कापूस पाते धरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने २२ ते २५ दिवस ताडण दिली. यामुळे सोयाबीनची फुल आणि शेंगा, कापसाची पाते गळती होऊन मोठं नुकसान झालं. यानंतर सोयाबीन काढणीला व कापसाचे बोंड परिपक्व झालेले असताना परतीच्या पावसाने तब्बल दहा दिवस हजेरी लावल्याने दोन्ही पीक नासून जागेवर मातीत मिसळून गेले. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस हेच प्रमुख पीक असून या दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाले. याची नुकसान भरपाईही मिळाली नसल्याने शेतकरी मायबाप सरकारच्या निर्णयाकडे टक लावून बसला आहे. बीड जिल्ह्यासाठी शासनाने ४१० कोटी रुपये दिले आहेत. पण ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहेत. परंतु अतिवृष्टी पेक्षाही सततच्या पावसामुळे पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना फुटकी कवडीही जाहीर झालेली नाही. यामुळे शेतकरी दर वाढेल अन् झालेलं नुकसान भरुन निघेल आशेवर होता. मागील नोव्हेंबर महिन्यात ( दि. ७ ) राज्यातील सोयाबीनची म्हत्वाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लातूर येथे ५ हजार ९३० असा दर होता. आज बुधवार ( दि. ७ ) डिसेंबरला ५ हजार ५५० इतका दर आहे. थोडे-थोडे करत महिन्यात तब्बल ३८० रु. प्रतिक्विंटल दर खाली आले. यामध्ये डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून घसरण सुरू आहे. कापसाचेही असेच असून नोव्हेंबर मध्ये कापूस ९ हजार ३०० प्रतिक्विंटल होता. यातही डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून घसरण होत ८ हजार ५०० पर्यंत दर खाली आले. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सावध पावित्रा घेत माल विक्रीसाठी न आणता साठवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारात सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांची आवक कमी आहे. आवक नसल्याने बाजारावर एक प्रकारे दबाव वाढत असल्याने याचा परिणाम म्हणून दरात सुधारणा होऊ शकते.
बाजारावर आयात,निर्यातचा परिणाम!
सध्या रशिया व युक्रेन या देशांनी सुर्य फुल तेलाची निर्यात जोरदार सुरू केली. यामुळे सोया तेलचे दर पडले असल्याने याचा परिणाम सोयाबीनवर पडल्याचे तर कपडा उद्योगावर मंदी असून निर्यातही कमी झाल्याने सुताला उठाव नाही. या कारणांमुळे दोन्ही पिकांचे दर घसरत असल्याचे जाणकारांचे अंदाज असल्याचे वृत्त अनेकांनी दिले आहेत.