लोकगर्जनान्यूज
बीड : आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पुन्हा सोमवार ( दि. १३ ) पासून राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. यामुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
या आठवड्यातच अवकाळी पावसाने झोडपून काढत अनेक भागातील शेतकऱ्यांचा घास हिरावला आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला असून, संकट टळले म्हणून आहे ते पदरात पडेल असा विचार करत असतानाच पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. रविवार पासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन सोमवार पासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकण,उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होईल. हा पाऊस हलक्या स्वरुपाचा असेल, परंतु गुरुवार -शुक्रवार असा दोन दिवस म्हणजे १६ व १७ तारखेला पुर्ण राज्यभरात मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी प्रतितास ३० ते ४० किलोमीटर वाऱ्याचा वेग राहील असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. यामुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. आपल्या पिकांना नुकसानी पासून वाचवावे असे आवाहन करण्यात येत आहे.