सेफ्टी टॅंकची ( safety tank ) सफाई करताना पाच मजुर ठार:एक गंभीर
लोकगर्जनान्यूज
सोनपेठ : शौचालयाचा हौद ( safety tank ) ची सफाई करताना गुदमरून पाच मजुरांचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना सोनपेठ जवळ भाऊचा तांडा येथे गुरुवारी ( दि. ११ ) रात्री उशिरा घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग व पोलीसांनी धाव घेतली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जखमींवर प्रथम परळी येथे व नंतर अंबाजोगाई येथे उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
भाऊचा तांडा ता. सोनपेठ ( जि. परभणी ) येथे शेतात एका शेतकऱ्याच्या शौचालयाचा हौद ( safety tank ) ची सफाई करण्यासाठी सहा मजुर आले. त्यांनी गुरुवारी ( दि. ११ ) दुपारी ३ वाजता हौदात उतरुन काम सुरू केले. सदरील काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. रात्री उशिरापर्यंत काम सुरू असताना अचानक मजुरांना त्रास सुरू झाला. आतून काहीच हालचाल जाणवत नसल्याने हौदा जवळील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती पोलीस व आरोग्य विभागाला कळविली. माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पाच जणांना रुग्णवाहिकेतून परभणी येथे सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यू झाल्याचे घोषित केले. शेख सादेख रहिम ( वय ४८ वर्ष ), शेख शाहरुख सादेख ( वय २२ वर्ष ), शेख नवीद दाऊद ( वय २३ वर्ष ), शेख जुनेद दाऊद ( वय २५ वर्ष ), शेख फेरोज गफ्फार ( वय १८ वर्ष ) असे मयतांची नावे आहेत. शेख जमीर यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना प्रथम परळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु नंतर अंबाजोगाई येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. एकाच वेळी हातावर पोट असलेल्या मजुरांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून या घटनेने मराठवाडा सुन्न झाला. पाच कुटुंबांचा आधार हरवल्याने ते कुटुंब उघड्यावर आले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.