सीटाखालून साप निघाल्याने अपघातात ट्रॅक्टर चालक ठार; धारुर-केज रस्त्यावरील घटना
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : ऊस घेऊन केजच्या दिशेने चाललेल्या ट्रॅक्टर चालकाच्या सीटाखालून अचानक साप निघाला सापाला पहाताच चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन घडलेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी ( दि. २५ ) सायंकाळी धारुर शहरापासून जवळच केज रस्त्यावर घडली.
बळीराम नाईकवाडे रा. घागरवडा ( ता. धारुर ) असे मयत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. ते ट्रॅक्टर मध्ये ऊस भरुन केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याकडे चालले होते. दरम्यान सदरील ट्रॅक्टर धारुर पासून काही अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ आला. यावेळी ट्रॅक्टर चालक बळीराम नाईकवाडे यांना सीटाखालून साप निघाला. सापाला पहाताच त्यांचा ताबा सुटला अन् ट्रॅक्टर पलटी होऊन अंगावर कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेने धारुर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकरी, ट्रॅक्टर चालकांनी सावधगिरी बाळगून आपल्या सीटाची व आजुबाजुची पाहणी करुन ट्रॅक्टर मध्ये बसावं असा सल्ला देण्यात येत आहे.