सावित्रीमाईच्या विचारांची सध्या गरज – प्रा. सावंत
पिंपळनेर : अतिशय मागासलेल्या विचार सरणीच्या काळात महिलांचा कसला विचार केला जात नव्हता, अशा परिस्थित महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी महिलांसाठी भरीव कार्य केले. त्यांच्या विचारांची सध्याच्या परिस्थितीत खरी गरज असल्याचे मत प्रा. सुरेश सावंत यांनी व्यक्त केले.
पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीमाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात प्रा. सावंत बोलत होते, तर व्यासपीठावर डॉ. गणेश नरवडे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना प्रा. सावंत म्हणाले की, इंग्रज सरकारच्या काळात सामान्य माणसाचा आवाज दाबला जात होता पण फुले यांचे सामाजिक काम थांबले नाही. मनुवादी विचारांचा प्रभाव असतांना महिलांसाठी काम करणे अवघड होते. परंतु म.फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण आणि महिलांचे प्रश्न हाती घेऊन एक नवी दिशा दाखवण्याचे काम केले. यानंतर डॉ.नरवडे यांनी मुलींच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मुलींनी सावित्रीमाई फुले यांची वेषभुषा करुन कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाला प्राचार्या विद्या अय्यर, सुरेखा यादव, राजलक्ष्मी मुळीक सह विद्यार्थी उपस्थित होते.