साळेगावाच्या वणव्यात चाळीस एकरावरील चाऱ्याची राख
अंबाजोगाई,केजच्या बंबानी आग विझवण्याचे प्रयत्न
केज : तालुक्यातील साळेगाव येथे आज सकाळी अचानक वाळलेले गवताने पेट घेतल्याने वणव्याचे रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने केज व अंबाजोगाई येथील अग्निशमन बंब पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत चाळीस एकरावरील चाऱ्याची राख झाली.
केज-कळंब रस्त्यावर साळेगाव शिवारातील काझी नजीरोद्दीन यांच्या शेतातील गवताने बुधवारी ( दि. २३ ) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. गवत वाळलेले व उन्हाचा चटका वाढलेला असल्याने आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. घटनेची माहिती पत्रकार गौतम बचुटे यांना अंधारे लाला यांनी दिली. त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तहसील व पोलीस प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच तहसीलदार यांनी प्रथम केज येथील एक अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाठवलं आगीचे रुप पहाता एका बंबाने आग आटोक्यात आणणें शक्य नसल्याने अंबाजोगाई येथील अग्निशमन बंब पाचारण केले. महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीमुळे मात्र तब्बल चाळीस एकरावरील चाऱ्याची राख झाली. जनावरांचा चारा जळाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी दक्ष रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.