लोकगर्जनान्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथील मुख्य रस्त्यावर असलेलं सराफा दुकान शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील रोख रक्कम व चांदीच्या वस्तू असा १० हजारांचा ऐवज चोरीला गेला. परंतु दुकानातील तिजोरी न फुटल्याने मोठं नुकसान टळल्याची माहिती दुकानदाराने दिली. चोरीची पद्धत जुनीच असून मागील १० वर्षांपासून याच पद्धतीने आडस येथे चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांवर वरचढ चोरटे ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बालाजी ज्वेलर्स या सराफा दुकानाचे शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून व आतील चॅनल गेटचे कोंडे तोडून दुकानात घुसले, आतील कपाट तोडून त्यातील चिल्लर म्हणून ठेवलेले रोख ५ हजार तसेच चांदीच्या काही अंगठ्या व इतर काही असा एकूण १० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती बालाजी ज्वेलर्सचे उत्तम पवार यांनी दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंत आडस चौकीचे पोलीस कर्मचारी व पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांनी भेट दिली. यानंतर बीड येथे श्वान पथक व ठसे तज्ञांना माहिती देण्यात आली. दुपारी श्वान पथक दाखल झाले. परंतु श्वान पथकालाही माग काढण्यात अपयश आले. परंतु ठसे तज्ञांना काही ठिकाणी ठसे मिळून आले आहेत. रहदारीच्या ठिकाणचे दुकान फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
चोरीची पद्धत जुनीचं
येथे जवळपास मागील १० वर्षांपासून प्रत्येक ५-६ महिन्यात चोरीची घटना घडतेच व पद्धत ही एकच दुकानाचे शटर उचकटून फोडणे व आतील रोख रक्कम चोरणे, अशी आहे. अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. पण अद्याप एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही. पण चोरटे त्यांचे काम चोख बजावत असल्याचे वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने दिसून येत आहे.
या माग दडलंय काय?
चोरीची घटना घडली की, दुकानदार रोख रक्कम व काही मालही गेल्याचे सांगतात परंतु पोलीस आली व पहाणी केली की, तक्रारही दाखल करत नाहीत तर आपलं थोडं गेलय म्हणून काय तक्रार करुन फायदा असे म्हणतात. यात अगोदर वेगळं अन् नंतर वेगळं बोलण्यात येते. हे प्रत्येक चोरीच्या घटनेवेळी दिसून येत. यामागे नेमकं दडलं काय?