सरपंच, आमदार, खासदार ताई महिलांची सर्वात मोठी समस्या सोडवतील का?
बसस्थानक अन् सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने प्रवासी महिलांची कुचंबणा
लोकगर्जनान्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस हे मोठी बाजारपेठ असलेले अन् चाळीस गावांचे केंद्रबिंदू मानले जाते. परंतु येथे बसस्थानक व महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने प्रवासी महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. महिला मुलींनी बसची वाट पाहत रस्त्यावर तासनतास उभे रहावे लागते. यामुळे महिलांची ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. योगायोगाने सध्या गावच्या सरपंच, आमदार, खासदार या महिला असल्याने त्या ही अडचण समजु शकतात. म्हणून सरपंच, आमदार, खासदार ताई ही समस्या सोडवतील का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
आडस हे राज्य रस्ता क्र. २३२ वर वसलेले मोठी बाजारपेठ असलेले गाव असून येथील आठवडी बाजार हा जिल्हाभरात प्रसिद्ध आहे. तसेच येथील शेळी बाजार तर राज्याबाहेर प्रसिद्ध आहे. येथे शाळा, कॉलेज , दवाखाने असल्याने परिसरातील जवळपास चाळीस गावांचा येथे संपर्क असतो. अंबाजोगाई, लातूर, धारुर, बीड येथे जाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांना येथूनच प्रवास करावा लागतो. परंतु येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे राहून बसची वाट पाहावी लागते. बसण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. आजुबाजुला फक्त हॉटेल,पान टपऱ्यांच्या आडोशाला उभे रहावे लागते. बसस्थानक नसल्याने महिलांसाठी स्वच्छतागृह असण्याचा प्रश्नच नाही. चौकापासून चारही रस्त्यांवर जवळपास एक कि.मी. पर्यंत दुकाने आणि घरे आहेत. या नैसर्गिक विधीसाठी महिला कुठेही जाऊ शकत नाहीत. यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. ही महिलांची अडचण पाहून येथे बसस्थानक व्हावे अशी मागणी आहे तर यासाठी मागे सविता आकुसकर यांनी आंदोलन केले. परंतु याकडे अद्याप कोणीही लक्ष दिले नाही. महिलांची अडचण महिलाच समजु शकतात. अन् सध्या याभागाचे गल्लीपासून दिल्ली पर्यंत महिलाच प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये आडस ग्रामपंचायतीच्या सरपंच आडसकर परिवाराच्या धाकट्या सुनबाई सौ. योगेश्वरी आडसकर आहेत तर केज मतदारसंघात आडस हे गाव येतो या मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिता मुंदडा आहेत. बीडच्या खासदार सौ. प्रीतम मुंडे आहेत. हे महिला नेतृत्व पहाता येथील बसस्थानक व महिलांसाठी स्वच्छतागृहाचा प्रश्न सुटेल अशी आशा आहे. हा प्रश्न सुटला तर ही या भागातील महिलांसाठी एकप्रकारे मोठा दिलासा अन् अप्रतिम भेट समजली जाईल अशी भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे.
भांडार कक्षात उकिरड्या पेक्षा बसस्थानक बरा
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धारुर रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे भांडार कक्ष आहे. परंतु सध्या याची बकाल अवस्था झाली असून इमारतही पडली आहे. येथे पुर्वी एक कर्मचारी नियुक्त असायचा आता तोही नाही. या जागेचा वापर परिसरातील लोक कचरा टाकण्यासाठी करत आहेत. त्यामुळे हा भंडार कक्षाला उकिरड्याचे रुप आले आहे. या पेक्षा लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी लक्ष घालून भंडार कक्ष राज्य परिवहन महामंडळाला वर्ग करुन बसस्थानक बांधावे.
शिवरुद्र आकुसकर, आडस