सरकारने वाऱ्यावर सोडलेल्या अन् परतीच्या पावसाने मारलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन, कापसाचे दर तारणार का?
लोकगर्जनान्यूज
बीड : शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान भरपाईचा अद्याप काहीच निर्णय न घेऊन वाऱ्यावर सोडलेल्या अन् परतीच्या पावसाने तोंडातील घास पळवून मारलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे वाढते दर तारणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीन, कापसाचे वाढते दर पहाता संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र दिसून येत आहे.
यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी कष्टदायक ठरला आहे. सुरवातीला पाऊस लवकर पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली, खत,बी-बियाणे खरेदी करून पेरणीसाठी शेतकरी तयारीत होता. पण पावसाचे उशिरा आगमन झाले. तेही कुठे कमी कुठे जास्त झाल्याने पेरण्या मागे पुढे झाल्या. पेरण्या झाल्यानंतर पीक अंकुरात असताना अतिवृष्टी झाली. यामध्ये कोवळ्या पिकांचे नुकसान झाले. पाऊस उघडताच यावर्षी प्रथमच गोगलगायने पिकांवर हल्ला केला. यात मोठं नुकसान झालं. गोगलगायचा पीक विम्यात समावेश नाही म्हणून विमा कंपनीने हात वर केले. शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करून गोगलगाय वेचून नष्ट केली. यानंतर या संकटाची तीव्रता कमी झाली. यानंतर पीक मध्य अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवली तब्बल २५ दिवस पावसाने ताण दिल्याने सोयाबीन फुलात व पापडी अवस्थेत शेंग असल्याने ती गळून पडले. यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत ओरड वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी रँडम सर्वे करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार रँडम सर्वे झाले. याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५% ॲग्रीम देण्याची अधिसूचना काढली. परंतु विमा कंपनीने पत्र पाठवून ४७ ऐवजी २८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ %ॲग्रीम देण्याचे मान्य केले. नुकसान होऊनही विमा कंपनी शेतकऱ्यांचा विचार करत नाही हे पाहून शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला. आंदोलन झाली पण काहीच परिणाम दिसून आला नाही. पण कर्मातच नव्हतं म्हणून शेतकरी शांत झाला. आहे त्या पिकाची काळजीत व्यस्त झाला. सोयाबीन काढणीला आलेलं असताना तर कापसाचे बोंडे चांगले परिपक्व झाले असताना पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. सलग दहा दिवस परतीचा पाऊस कोसळत असल्याने शेताला तलावांचे रुप आले. काढलेलं व उभ्या सोयाबीनची जागेवर माती अन् कापसाच्या वाती झाल्या. यानंतर मात्र शेतकरी हतबल झाला. आधीच तीस ते चाळीस टक्के नुकसान अन् परतीच्या पावसामुळे त्यात आणखी भर पडली. यानंतर विमा कंपनीने ७२ तासात तक्रारी करण्याचे सांगितले. काही शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून ऑनलाईन तक्रारी केल्या. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन अथवा माहिती नसल्यामुळे तक्रारी राहून गेल्या आहेत. ऑफलाईन तक्रारी करण्यास सांगितले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पीकच नाही तर पंचनामे कशाचे करणार म्हणून त्यातही काही शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही. शेती उध्वस्त झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी, पुढाऱ्यांनी बांधावर जाऊन फोटो सेशन केले. पालकमंत्री, कृषीमंत्री यांनी नुकसान भरपाई देणार म्हणून आश्वासन दिले. पण अद्याप काहीच ठोस निर्णय घेतला नसल्याने सरकार ख्यालीपुलाव मध्ये व्यस्त दिसत असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यासर्वात एक समाधान कारक चित्र आहे. ते म्हणजे सोयाबीन,कापसाची दरवाढ. ४२०० वर गेलेले सोयाबीनचे दर आज सोमवारी ( दि. १४ ) ६ हजार १५० ते ५ हजार ९६० ते ५ हजार ८०० असे आहेत. तर कापूस ही ६ हजारांपर्यंत गेला होता. पण सध्या याचेही दर वाढून ९ हजार ३०० पर्यंत पोचले आहेत. हे वाढते दरच शेतकऱ्यांना तारणार असे दिसून येत आहे. परंतु आणखी किती वाढ होणार? कुठं स्थिर होणार? याबाबत स्पष्टता नाही. परंतु शेतीमाल बाजारभाव अभ्यासक दर वाढणार असे म्हणत आहेत. पण सोबतच टप्याटप्याने शेतकऱ्यांनी माल विकणे फायद्याचे ठरेल असे म्हणत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करुन आपलं माल विकण्याचा निर्णय घ्यावा. नाहीतरी गत वर्षीचे सोयाबीन आणखीही काही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.