समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू – खा.शरद पवार
दिल्ली पासून गल्लीपर्यंत सर्वांचाच घेतला पवारांनी समाचार

लोकगर्जनान्यूज
बीड : लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचे काम केंद्राकडून होत असून तसेच समाजा-समाजात भांडणे लावून अंतर वाढविण्याचा एक कलमी कार्यक्रम सत्ताधारी करत आहेत. सत्तेसाठी भाजपाच्या बाजूने जाणाऱ्यांना त्यांची जागा जनताच दाखवेल असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा. शरद पवार यांनी बीड येथे स्वाभिमानी सभेत दिल्ली पासून गल्लीपर्यंत सर्वांनाच अक्षरशः आपल्या वाणीतून फोडून काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटल्यानंतर खा. शरद पवार हे प्रथमच बीड जिल्हा दौऱ्यावर आले. ते येण्याच्या पहिल्या दिवशी शहरात साहेब कामाच्या माणसाला आर्शिवाद द्या म्हणून अजित पवार समर्थकांचे फलक झळकले. हे पहाता पवार साहेब बीडमध्ये काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यांनी स्वाभिमानी सभेला मार्गदर्शन करताना सर्वच प्रश्ननांना हात घालत टिका केली. सर्व प्रथम त्यांनी शेतकरी व शेती संबंधी वाढते खतांचे दर व पडत असलेल्या शेती मालाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करत काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी संकटात सापडला असल्याचे म्हटले. राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्यांना तुम्ही सत्तेच्या बाजुने गेलात खुशाल जा परंतु जनताच तुम्हाला निवडणुकीत कुठे पाठवायचं हे जनता ठरवेल. ज्यांच्याकडून आयुष्यभर फक्त घेतच आलात त्यांच्या बाबतीत थोडी माणुसकी पाळा. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचे काम केले जात आहे. मणिपूर जळत असून महिलांची नग्न धिंड काढली जात आहे पण तिकडे पंतप्रधान ढुंकूनही पाहत नाहीत. समाजा-समाजात व गावा-गावात भांडणे लावून अंतर वाढविण्यात येत असल्याची टीकाही खा. पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, राजेश टोपे, रोहित पवार, अशोकराव गायकवाड, महेबुब शेख, कॉंग्रेसचे अशोक पाटील, राजेसाहेब देशमुख सह आदिंची उपस्थिती होती. यावेळी सभेसाठी जनसागर लोटल्याचे चित्र दिसून आल्याने बीड जिल्हा आजही पवारांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले.