सत्तासंघर्षाची जोरदार चर्चा पण दररोज बाप लुटला जातोय त्यावर कोण बोलणार?
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस, सोयाबीन तेजीत अन् आपल्याकडे घसरण
लोकगर्जनान्यूज
बीड : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, कापूस तेजीत असल्याच्या बातम्या धडकत असून, आपल्याकडे मात्र भाव घसरत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. दोन दिवसांत कापूस 200 रु. तर सोयाबीन आज गुरुवारी 20 रु. घसरले आहे. परंतु कालपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची जोरदार चर्चा सुरू असून अनेकजण त्या बातम्या शेअर करत आहे. त्यावर प्रतिक्रिया देत आहे. पण शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्याला दररोज बाप लुटला जातोय याचं काहीच पडलेलं नसून, त्याला राज्याची चिंता असल्याने त्यावर व्यक्त होत आहे. परंतु शेतमालाचे पडते भाव यावर कोण बोलणार असा प्रश्न आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस, सोयाबीन तेजीत असल्याच्या बातम्या धडकत आहेत. परंतु आपण स्थानिक बाजारभाव पाहिले असता ते घसरत असल्याचे दिसून येईल. कापूस तर मागील दोन -तीन दिवसांमध्ये तब्बल 200 रु. घसरला आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत असेल तर आपल्याकडे भाव का पडत आहेत? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तसेच येथील व आपल्याकडील परिस्थिती काही वेगळी असू शकते परंतु कापूस तर सारखाच असतो! गठाणचे भाव त्याच आंतरराष्ट्रीय बाजार नुसार ठरतात ना? मग शेतकऱ्यांच्या कापसाला भाव कमी का? वाढ नाही तर घसरण का? दोन-तीन दिवसांपूर्वी 7750 ते 7800 घेतला जाणारा कापूस आज 7550 ते 7600 वर पोचला असल्याने निदान आहे तो दर कायम असायला हवा होता. अशीच अवस्था सोयाबीनची झाली. याचेही दर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत असल्याचे वृत्त आहे. परंतु मागील चार दिवसांपूर्वी 5110 वरुन 5210 वर गेलेले दर गुरुवार पासून खाली आलेले दिसत असून, यामध्ये 20 रु. घट झाली आहे.अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन दर वाढतील म्हणून घरात ठेवलेला आहे. पण दर वाढत नाहीत की, वाढविले जात नाही? हा प्रश्न आहे. परंतु यावर कोणीही बोलताना दिसत नाही. दोन दिवसांत कापूस 200 अन् सोयाबीन 20 रु. घसरले याची कोणालाच खबर नाही. पण राज्यातील ठाकरे-शिंदे संघर्षाची चिंता प्रत्येक शेतकरी पुत्र त्यावर चर्चा करत आहेत. परंतु शेतमालाचे भाव पडल्याने दररोज बाप लुटला जातोय त्यावर कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही.
सरकार कोणाचे यामुळे काही फरक पडणार नाही पण शेतमालाला योग्य भाव नसल्याने फरक पडतो
राज्यातील असो की, दिल्लीत सरकार कोणाचे आले अन् कोणाचे गेले यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही. कुटुंबातील सदस्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक सामान्य माणसाला मेहनत करावीच लागते. परंतु मेहनतीने पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव नाही मिळाला तर नक्कीच फरक पडतो. 11 हजारांवर पोचलेले सोयाबीन अन् 13 हजारांवर गेलेला कापूस आज 7 हजार 500, सोयाबीन 5 हजारने विकला जात आहे. हे दर का घसरले हा प्रश्नच व्यवस्थेला शेतकरी पुत्र कधी विचारणार आहेत.