सकाळी रोजच धुक्याची चादर शेतकरी हवालदिल, खर्चात वाढ
बीड : जिल्ह्यात गत काही दिवसापासून ढगाळ वातावरण आणि धुक्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. रोजच सकाळी धुक्याची चादर निर्माण होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांची वाईट अवस्था होत असल्याने शेतकरी खते औषधावर खर्च करीत असल्याने खर्चात वाढ होत असून तो हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्यात या वर्षी चांगला पाऊस झाला. काही भागात तर पावसाने शेतकऱ्यांना रिकामे केले. हातात काहीच ठेवले नाही, उत्पन्नात मोठी घट झाली, मात्र विहिर, बोअरला चांगले पाणी असल्याने शेतकऱ्यांनी निराश न होता रब्बी हंगामात जोमाने काम सुरु केले. शेतात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा तसेच भाजीपाल्याचे पीक घेतले आहे. पण कधी महावितरण तर कधी निसर्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पाऊस आणि धुके यामुळे उत्पान्नात घट होत असून शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या तर रोजच सकाळी धुक्याची चादर निर्माण होत असल्याने गहू, हरभरा, कांदा या पिकावर मोठा परिणाम होत असून पीक रोगमुक्त करण्यासाठी महागडी औषधे फवारावी लागत आहेत. यामुळे खर्च अधिक अन् उत्पन्न कमी अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.