संघटित झाल्याशिवाय प्रगती नाही – अक्षय मुंदडा

लोकगर्जना न्यूज
आडस : बांधकाम मिस्त्री व कामगार हे असंघटित कामगार म्हणले जातात. संघटित झाल्याशिवाय प्रगती होत नाही. तुम्ही संस्थेच्या माध्यमातून संघटित झालात याबद्दल अभिनंदन करुन बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे आश्वासन युवा नेते अक्षय मुंदडा यांनी आडस ( ता. केज ) येथील बांधकाम मिस्त्री व कामगार मार्गदर्शन मेळ्यात बोलताना दिले.
एकअधार सेवा भावी संस्था व बांधकाम मिस्त्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ( दि. २१ ) आडस ( ता. केज ) येथे सकाळी मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी युवा नेते ऋषिकेश आडसकर हे अध्यक्षस्थानी तर अक्षय मुंदडा उद्घाटक म्हणून उपस्थित होते. भागवत नेटके, बालासाहेब ढोले, उद्धवराव इंगोले, सादेख इनामदार, ओमकार आकुसकर, बिळासाहेब देशमुख, प्रशांत चव्हाण, बालासाहेब ढोले, सविता आकुसकर यांच्यासह आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अक्षय मुंदडा म्हणाले की, बांधकाम कामगारांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. याचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंदणी आवश्यक आहे. प्रत्येक कामगाराने नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करून तुमच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करण्यात येईल तसेच रमेशराव आडसकर व नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आडस येथे कामगार नोंदणी मेळावा घेण्यात येईल असे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात ऋषिकेश आडसकर म्हणाले की, मिस्त्री व कामगारांनी चांगले व दर्जेदार कामे करत विश्वास निर्माण करावं, कामगारांची प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मी सदैव तयार असून, तुम्ही फक्त हाक द्या असे म्हणत मिस्त्री व कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी आमदार ताईंच्या माध्यमातून प्रयत्न करावे अशी मागणी अक्षय मुंदडा यांच्याकडे केली. यावेळी सादेख इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक शिवरुद्र आकुसकर तर संचलन व अभार रामदास साबळे यांनी मानले. यावेळी केज, अंबाजोगाई, धारुर तालुक्यातील बांधकाम मिस्त्री व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली. मेळावा यशस्वी होण्यासाठी बांधकाम मिस्त्री असोसिएशन व एक अधार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.