शेवटी ‘त्या’ मृतदेहावर अंत्यसंस्कार
केज : तालुक्यातील सोनेसांगवी येथे स्मशानभूमी नसल्याने मयत महिलेचा मृतदेह तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवला. याप्रकरणी केजचे तहसीलदार दुल्हाजी मेंडके यांनी स्वतः विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन तिढा सोडविला. प्रस्तावित स्मशानभूमी जागेवर अंत्यविधी करण्यात आला.
सोनेसांगवी येथे दलित समाजासाठी स्मशानभूमी नाही. काही वर्षांपूर्वी सुर्डी आणि सोनेसांगवी या दोन गावातील दलित बांधवांसाठी माळेगाव शिवारात गायरान जमीन स्मशानभूमीसाठी दिली. परंतु तेथील काही दलित बांधव गायरान कसून उपजिविका भागवित आहेत. त्यामुळे त्यांनी अंत्यविधीला विरोध करत आहेत. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने गावातील एका ठिकाणी जागा देण्याचे निश्चित करुन तसा ठराव ही घेण्यात आला. परंतु प्रस्तावित स्मशानभूमीला लागून असलेल्या काही शेतकऱ्यांनी विरोध केल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला. दरम्यान मंगळवारी ( दि. ४ ) रात्री १० च्या सुमारास लक्ष्मीबाई शहाजी कसबे यांचे निधन झाले. अंत्यविधी कुठं करावं?हा प्रश्न नातेवाईकांपुढे निर्माण झाला. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट केज येथे तहसील कार्यालयात आणून ठेवला. या घटनेने येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाची सखोल माहिती घेतली. सर्व कागदपत्रांची तपासणी करून नातेवाईकांशी सविस्तर चर्चा करुन मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाण्यासाठी राजी केले. स्वतः तहसीलदार हेही अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले. ज्या शेतकऱ्यांचा प्रस्तावित स्मशानभूमीला विरोध होता त्यांची समक्ष भेट घेऊन त्यांची समजूत काढून राजी केले. यानंतर प्रस्तावित स्मशानभूमी जागेवर दुपारी साडेतीन वाजता सदरील मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, सरपंच विजयकुमार इखे, रिपाईचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे, रविंद्र जोगदंड, मुकुंद कणसे तसेच यूसुफवडगाव ठाण्याचे प्रभारी सपोनि डॉ. संदीप दहिफळे, केजचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पत्रकार गौतम बचुटे यांनी ही मध्यस्थी करत हा प्रश्न सोडविला. यावेळी अंत्यविधी स्थळी आणि तहसील कार्यालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.