शेतीसाठी रात्री अपरात्री वीजपुरवठा शेतकऱ्याच्या जीवावर बेतला… बीड जिल्ह्यात दुर्दैवी घटना
ज्वारीला पाणी देताना सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
लोकगर्जनान्यूज
बीड : रात्रीची लाईट ( वीजपुरवठा ) असल्याने ज्वारीला पाणी देताना अंधारात साप न दिसल्याने शेतकऱ्याला चावा घेतला. यामुळे शेतकऱ्याचा आज शनिवारी ( दि. १९ ) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. रात्रीचा शेतीसाठी वीजपुरवठा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी दिवसाच वीजपुरवठा असा निर्णय शासनाने घ्यावा अन्यथा असे अनेक शेतकऱ्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रामेश्वर भागवतराव लोणकर ( वय ३५ वर्ष ) रा. निपाणी जवळका ( ता. गेवराई ) हा तरुण शेतकरी शेतीचा वीजपुरवठा रात्रीचा असल्याने शुक्रवारी ( दि. १८ ) रात्री ज्वारी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला. यावेळी अंधार असल्याने काहीही दिसत नव्हते. यावेळी अचानक विषारी सापाने दंश केला. सापाने दंश केल्याचे लक्षात येताच तातडीने दवाखाना गाठला डॉक्टरांनी परिस्थिती पाहून प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे रेफर केले. तेथे उपचारादरम्यान आज शनिवारी सकाळी रामेश्वर यांची प्राणज्योत मालवली. ही दुर्दैवी घटना समजताच गावावर शोककळा पसरली आहे. शेतकऱ्यांना पिकं जगविण्यासाठी रात्री अपरात्री कधीही शेतात जावं लागतं. अंधारात असे प्रसंग आले तर जीवावर बेततात यामुळे शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु याकडे कोणीही गांभीर्याने विचार करत नाही असे दिसून येत आहे. जर शासनाने शेतीसाठी दिवसाचं वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतला नाही तर अशा घटना घडत रहातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासकीय नोकरदारांना आपली सेवा बजावण्यात काही अडचणी येऊ नयेत म्हणून शासन अनेक सोयीचे निर्णय घेतो. अन् घेणेही आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती म्हत्वाचा आहे. पण शेतकरी म्हत्वाचा नाही का? असा प्रश्न पडत असून दिवसा शेती पंपासाठी वीजपुरवठा द्यावा म्हणून मागणी करुनही कोणीही यासाठी गंभीर नाही. असे दिसून येत असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.