शेतात वीज पोहोचली लाईनमन नाही; शेतकऱ्यांनाच जिवावर उदार होऊन टाकावं लागतं फ्यूज
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे अथवा लाईनमन उपलब्ध करावे
लोकगर्जनान्यूज
बीड : शेतात वीज पोहोचली पण लाईनमन पोहचत नाही. यामुळे शेतकरी जिवावर उदार होऊन फ्यूज टाकतात. हे अलिखित नियम आहे. मग संतोष मुंडे सारख्या घटना घडतात. यामुळे दुसरा संतोष मुंडे कोणी ठरण्याआधी महावितरण कंपनीने रात्री बेरात्री फ्यूज गेला तरी त्यासाठी लाईनमन नियुक्त करावा अथवा प्रत्येक डिपीवरील चार शेतकऱ्यांना फ्यूज टाकण्याचं प्रशिक्षण व संरक्षणासाठी सर्व साहित्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी ( दि. १३ ) सायंकाळी धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथे डिपीवरील फ्यूज टाकण्यासाठी गेले असता करंट लागून बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध टीक टॉक स्टार संतोष मुंडे आणि बाबुराव मुंडे या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने शेतकऱ्यांकडे संकटांची कमी नाही याचे दर्शन घडले. कोरडा,ओला दुष्काळ आहे. पण इतरही संकटं वीज शेतापर्यंत पोहोचली पण व्होल्टेज ( योग्य दाबाने ) वीजपुरवठा होत नाही, रात्री बेरात्री कधीही शेतीसाठी वीजपुरवठा दिला जातो. कधी रात्री बारा वाजेपर्यंत असततर कधी बारा पासून सकाळी पर्यंत. मग यावेळी डिपीवरील फ्यूज जातो तेव्हां लाईनमन साहेब झोपेत असतात, तसेही दिवसा फोन न घेणारी ही कर्मचारी रात्री का फोन घेतील? आपले पीक भिजणार नाही. या चिंतेने शेतकरी डिपीजवळ जातो थंडीने कुडकुडत असताना जिवावर उदार होऊन तो हातातील काठीने फ्यूज तार दाबतो, किंवा त्यानं विकत घेतलेली पक्कड असते त्याने फ्यूज टाकतो. यावेळी शेतकऱ्यांच्या हातात ग्लोज, पायात गम बुट नव्हे तर चिखल असतो. यामुळे साधीही चुक झाली तर त्याचा कोळसा होतो. शेतकरी वाचवायचा असेल तर जसं शेतात वीज पोहोचली अन् रात्री बेरात्री शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यात येईल तो तसा महावितरण कंपनीने २४ तास कर्मचारी उपलब्ध करुन द्यावे. यासाठी एक गृहाक क्रमांक वेगळा द्यावं ( लाईनमनचे नंबर बंद असतात अथवा ते फोन घेत नाही ) जर महावितरण कंपनी हे करु शकत नसेल तर निदान प्रत्येक डिपीवरील चार शेतकऱ्यांना फ्यूज टाकण्याचं प्रशिक्षण व संरक्षणासाठी लागणारं पक्कड, मारतूल ( स्क्रु ड्रायव्हर ), ग्लोज, गम बुट सह आदि साहित्य तसेच परमेटचा अधिकार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.