शेतकऱ्यांसाठी ७२ तासांची मर्यादा अन् विमा कंपनीचे सवडीनुसार काम
अनेकांच्या खात्यावर आणखी ही रक्कमचं जमा नाही?
लोकगर्जना न्यूज
नुकसानीची तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांना ७२ तासांची मर्यादा देणारी पीक विमा कंपनी मात्र सवडीनुसार काम करत असल्याचं चित्र आहे. काही शेतकऱ्यांना वीमा रक्कम खात्यावर जमा झाल्याचे मेसेज आले. अनेक शेतकऱ्यांना आणखी प्रतिक्षाच असून, आमचं विमा कधी येतय म्हणून बँकेत चकरा मारत आहेत. यांच्या मनमानी कारभारावर कोणाचं नियंत्रण आहे का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
प्रत्येक वर्षीच पीक विमा कंपनी घोळ घालत असून, १९-२० मध्ये पिकांचे नुकसान झाले तरीही अद्याप नुकसान झालेल्या पिकांचं विमा मंजूर नाही. २०-२१ खरीपाची पीके अतिवृष्टीमुळे नेस्तनाबूत झाली. काही भागात तर शेतीसह पिकं अक्षरशः वाहून गेले आहे. इतकं नुकसान होऊन ही विमा कंपनीने ७२ तासांत नुकसान झालेले फोटो त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करण्यास सांगितले. जोरदार पावसामुळे आठ-आठ दिवस नद्या दुथडी भरून वाहत होत्या नदीच्या पलीकडे जाने म्हणजे मृत्यूला निमंत्रण होतं. पण पिके गेली, ७२ तासात नुकसानीची तक्रार नाही केली तर विमाही येणार नाही. त्यामुळे जीवावर उदार होऊन शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीचे फोटो काढून विमा कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केले. इतकं मोठं नुकसान होऊन ही हां…ना… करत कसाबसा कंपनीने विमा मंजूर केला. पहिलं हप्ता दिवाळीच्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. त्यानंतर मागील कांहीं दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यासाठी खरीप पीक विमा घेतलेल्या अग्रीकल्चरल इन्शुअरन्स कम्पनी ऑफ इंडिया चे व्यवस्थापक एस. व्ही. शेट्टी यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यात सॅम्पल सर्व्हेच्या आधारे बीड जिल्ह्यात ३६० कोटींचा क्लेम निश्चित करण्यात आल्याचे म्हटले. यानंतर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा झाल्याचे मेसेज आले. परंतु त्यातही घोळच घोळ आहे. क्षेत्र, पीक एकच परंतु रक्कम कमी जास्त त्यामुळे कोणते निकष कंपनीने लावले आणि किती टक्के नुकसानीची भरपाई देत आहे याचा ताळमेळ लागत नाही. अद्याप ही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमच जमा नाही. त्यामुळे ते आपल्या विमा येणार की, नाही ? या चिंतेत आहेत. रक्कम आलेली असेल परंतु मेसेज आला नसेल म्हणून शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. परंतु तेथून नकार घंटा मिळत असल्याने शेतकऱ्यांना सध्या काही ही समजत नसून ‘मुक्क्याला बुक्क्यांचा मार’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
यावर कोणीच बोलत नाही
पिक विमा भरुन ही हक्काचा विमा वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. तसेच अनेकांना खूप कमी रक्कम आलेली आहे. त्यामुळे विमा कंपनी नेमकं विमा कसा वाटप करत आहे. याबाबत शेतकऱ्यांना कोणीही काहीही सांगता नसून, पुढारी, प्रशासन सगळेच चिडीचूप असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.