शेतकऱ्यांसाठी म्हत्वाचे: पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत करा अर्ज

लोकगर्जनान्यूज
बीड : शेतकऱ्यांना शेतीसह दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आदि जोड धंदा करता यावं यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभ योजनेचे अर्ज स्विकारणे सुरू होणार आहेत. त्यामुळे शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी, पशुपालक शेतकरी यांनी माहिती घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक संकटांवर मात करत शेतकरी शेती कसत आहेत. परंतु आर्थिक स्थिती सुधारत नाही. शेतकऱ्यांना शेतीला धंद्याची जोड देता यावी म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनेच्या माध्यमातून शेळी,मेंढी गट, दुधाळ गाई, म्हशी गट, मांसासाठी कुक्कुटपालन १ हजार पक्षांचे शेड उभे करणे, १०० पक्षी वाटप या योजनांसाठी निवड प्रक्रिया २०२२-२३ राबविण्यात येणार आहे. यासाठी १९ फेब्रुवारी २०२३ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या वैयक्तिक लाभ घेणाऱ्या इच्छुक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी, पशुपालक शेतकरी यांनी https://ah.mahabms.com/webui/registration या साइटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा अथवा यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन असून संबंधित अधिकाऱ्यांशी माहिती घेऊन अर्ज भरावा. यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.अर्ज करताना कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धालय असे स्वतंत्र पर्याय निवडण्याची सुविधा आहे. हा अर्ज एकदा केला की, सन २०२५ ते २०२६ पर्यंत वैध रहाणार असून शेतकऱ्यांना दरवर्षी अर्ज करण्याची कटकट नाही. या योजने बाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक १९६२ अथवा १८०० २३३ ०४१८ या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळचा पशुवैद्यकीय दवाखाना, पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती, जिल्ह्यातील पशुधन अधिकारी, उपायुक्त पशुसंवर्धन यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.
मोबाईल नंबर बदलू नये
हा वैयक्तिक लाभाचा अर्ज भरताना संभधितांने जो मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. त्यावर वेळोवेळी अर्जाच्या बाबतीत काय स्थिती आहे याची मेसेज द्वारे माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराने नोंदविलेला मोबाईल क्रमांक बदलू नये.