शेतकऱ्यांसाठी म्हत्वाचे! येलो मोझॅकने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनो विमा मिळवण्यासाठी तातडीने हे काम करा
ऐन काढणीच्या वेळी प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीनचा झाला खराटा
लोकगर्जना न्यूज
बीड : सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे उभ्या पिकाचा खराटा झाल्याने विमा क्लेम मिळण्यासाठी तातडीने नुकसानीच्या फोटोंसह क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून तक्रार करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाची दडी, यापुर्वीही येलो मोझॅक मधून वाचलेले सोयाबीन पिकाची काढणी काही दिवसांवर आली आहे. याच वेळी केज, आडस सह पुर्ण जिल्ह्यात येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेंगा सुकत असून त्यात बी भरणा होत नाही. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेंगा, पान गळून पडत आहेत. फड ची फडातील सोयाबीनचा खराटा झाला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असे चित्र आहे. मागेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे रॅंडम सर्वे झालेले आहेत. परंतु विमा कंपनीच्या हेकेखोर पणामुळे अनेक शेतकरी २५ % ॲग्रीम पासून वंचित रहाण्याची चिन्ह आहेत. याप्रश्नी कोर्टात ही गेले तर विमा कंपनी ऑनलाईन तक्रार नाही असे काहीही कारण सांगून विमा क्लेम देण्यास ना..नु.. करते. अथवा वेळकाढूपणा करत उशीर करते. हे टाळण्यासाठी येलो मोझॅकमुळे पिकांचे नुकसान झालेल्या व २०२२ खरीप हंगामात प्रधान मंत्री पीक विमा योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान झालेल्या पिकांच्या फोटो सह क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून विमा कंपनीकडे तक्रार करावी. विमा क्लेम मिळण्यासाठी ही तक्रार आवश्यक आहे. २०२० चा विमा मिळवण्यासाठी याच एका चुकीमुळे विलंब लागत आहे. हा अनुभव पहाता शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार आवश्यक करावी असे मत कृषी तज्ञ व्यक्त करत आहेत.