शेतकऱ्यांसाठी म्हत्वाची बातमी! पेरणी योग्य पाऊस कधी होणार? पंजाब डक यांचा अंदाज
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : ४ जून पासून पावसाला राज्यात सुरुवात होईल अन् ८ जून पर्यंत राज्य व्यापला जाणार असून,पेरणी योग्य पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ञ पंजाब डक यांनी धारुर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळ्यात बोलताना व्यक्त केला. यावेळी सोयाबीन, कापूस याबाबत तज्ञांनी शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना ज्याची उत्सुकता असते असा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना पाऊस काळ कसा असेल, त्यानुसार पीक घेऊन चांगलं उत्पन्न मिळावे, कापूस, सोयाबीन या खरीपाच्या म्हत्वाच्या पिकांबाबतीत शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करता यावे या हेतूने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शुक्रवारी ( दि. २ ) छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड मध्ये शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हवामान तज्ञ पंजाब डक म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त करत शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली. तसेच येत्या ४ जूनला मान्सून महाराष्ट्रत दाखल होणार असून ८ जून पर्यंत राज्य व्यापला जाणार असून बहुतांश भागात पेरणी होईल असे म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकून घेण्याचं आवाहन केले. कृषी शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी सोयाबीन पिका संबंधी मार्गदर्शन करताना म्हणाले की, सोयाबीन बीबीएफ पद्धतीने घेतलं तर चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना एकाच वाणाच्या माघे न लागता जे सहज उपलब्ध होइल तेच बीज प्रक्रिया करत पेरणी करण्याचे सांगितले. कापूस शास्त्रज्ञ रामेश्वर चांडक यांनी मार्गदर्शन करताना म्हटलं की, कापसाचे झाड नाही तर उत्पन्न वाढीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. यासाठी अंतर मशागत,खत नियोजन करणं आवश्यक असल्याचे सांगून याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ. स्वरुपसिंह हजारी, राजाभाऊ मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सभापती मंगेश तोंडे,उपसभापती सुनील शिनगारे तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे, बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सोळंके यांची उपस्थिती होती.