शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनचे नवीन वाण आले: पावसाने खंड दिला तरी नो टेन्शन
लोकगर्जना न्यूज
इंदोर भारतीय संशोधन संस्थेने सोयाबीनचे नवे वाण एन आर सी १३६ विकसित केले. हे वाण पावसाने २० ते २५ दिवस खंड दिला तरी तग धरणारे आहे. यास मध्यप्रदेश सरकारने मान्यता दिली आहे.
आपल्याकडे पाऊस कधी येईल आणि कधी दडी मारेल याचा नेम नाही. या पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटाका बसत आहे. गतवर्षीचा विचार केला तर बीड, लातूर, उस्मानाबाद सह मराठवाड्यातील अनेक ठिकाणी परतीच्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या व काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. या जोरदार पावसामुळे शेतातील सोयाबीन बुडून गेल्याने जाग्यावरच कोंब फुटली होती. त्यामुळे गुडघ्या बरोबर पाण्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून घेतले. यावर्षी या उलट परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली. पेरणीनंतर पाऊस पडत राहिल्याने सोयाबीन पीक जोमात आले. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने तब्बल २५ दिवस दडी मारली. हा काळ सोयाबीनला फुले लागण्याच्या म्हत्वाचा टप्पा होता. याचवेळी पावसाने दडी मारल्यामुळे फुले गळून पडली तसेच पापडी अवस्थेत असलेली शेंग सुकून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु आता पावसाने दडी मारली तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने दहा वर्ष संशोधन करुन. बदलत्या वातावरणाचा परिणाम सहन करुन पावसाने ताण दिला तरी तग धरणारे एन आर सी १३६ हे वाण विकसित केले आहे. या वाणाच्या प्रसारणाला मध्यप्रदेश सरकारने मान्यता दिली आहे. बिहार सरकार कडून पुढील हंगामासाठी एन आर सी १३६ वाणाची मागणी केली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात चाचणी सुरू आहे. तीन वर्ष चाचणीचे निष्कर्ष नंतर येणारे परिणाम पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. चाचणीचे दुसरे वर्ष असल्याचे वृत्त आहे. यामुळे या वाणासाठी आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच एन आर सी १३६ हे वाण पाने खाणारी अळी, मुगबीन येलो मोझॅक रोगांसाठी प्रतिकारक तर, दाणे भरण्याच्या काळात २० ते २५ दिवस पावसाने ताण दिला तरी वाढ समाधानकारक होईल असे खास वैशिष्ट्य आहे. उत्पादन १७ क्विंटल पर्यंत अपेक्षित आहे. हे वाणआले तर यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे नुकसान झाले तसे नुकसान टळणार असे दिसून येते. त्यामुळे एन आर सी १३६ वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.