शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कापसाची घसघशीत वाढ तर सोयाबीन दरातही सुधारणा
लोकगर्जनान्यूज
बीड : वर्षभराची आर्थिक मदार असलेले सोयाबीन व कापसाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परंतु मागील तीन दिवसांपासून कापसाच्या दरात घसघशीत वाढ झाली तर सोयाबीनचे दरही सुधारत आहेत. वाढते दर पहाता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मागील वर्षाचा विचार केला तर शेवट पर्यंत कापसाला सरासरी प्रतिक्विंटल १२ हजार रुपये दर मिळाला. हा दर आजपर्यंतचा ऐतिहासिक असा दर आहे. वाढता दर पहाता गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी पुन्हा कापसाकडे वळले असून, कापूस लागवड काही टक्के वाढली आहे. तसेच या हंगामातील कापूस येण्यास सुरुवात झाली तेव्हा दर चांगले होते. १३ ते १४ हजार दर होता. परंतु कापसाची आवक वाढली की, कापसाचे दर कोसळण्यास सुरुवात झाली. यासाठी कापड उद्योगाची मंदी कारणीभूत असल्याचे सांगितले गेले. उतरते दर पहाता कापूस वेचणी होताच शेतकऱ्यांनी विक्री न करता कापसाची थप्पी लावण्याला पसंती दिली. आवक कमी असतानाही कापूस दरांची घसरण सुरूच होती. ( दि. २८ ) डिसेंबरला तर कापूस ७ हजार ६०० ते ३०० वर पोचला. परंतु पाच दिवसात कापसाने पुन्हा उसळी घेतली असून आज सोमवार ( दि. २ ) कापूस ८ हजार ३०० वर पोचला आहे. तब्बल ७०० रु. सुधारणा झाली आहे.
सोयाबीन दरातही सुधारणा
खरीप हंगामातील दुसरं नगदी पीक असलेले सोयाबीन मागील पाच दिवसांपासून कासव गतीने का असेना वाढ सुरु आहे. कापसापेक्षा ही जास्त क्षेत्र सोयाबीनचे आहे. या सोयाबीनने ही सन २०२१ मध्ये शेतकऱ्यांना मालामाल केले. तब्बल ११ ते १२ हजारांपर्यंत सोयाबीन गेले होते. परंतु मागील वर्षी सरासरी ७ हजार ५०० रु. सोयाबीन विकलं गेलं. दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षीचा सोयाबीन घारातच ठेवला आहे. यावर्षी ही अद्याप शेतकऱ्यांना सोयाबीन अपेक्षित असा वाढला नाही. यंदाही शेतकरी सोयाबीनचा साठा करण्याला प्राधान्य देत आहे. त्यामुळे सध्या बाजारात सोयाबीनची आवक म्हणावी तशी नाही. दर घसरल्याने आणखी आवक घटत असल्याने बाजारावर शेतकऱ्यांचा दबाव आहे. सोयाबीनचे दर घसरत ( दि. २८ ) डिसेंबर सोयाबीन ५ हजार ४५० वर आले. परंतु आज सोमवार ( दि. २ ) जानेवारी सोयाबीन ५ हजार ५५० वर गेलेले आहे. पाच दिवसात सोयाबीन प्रतिक्विंटल १०० रु. सुधारले आहे. तसेच जागतिक पातळीवर सोयाबीनचे दर वाढत असल्याचे वृत्त असल्याने आपल्याकडेही या जानेवारी महिन्यात सोयाबीन दराची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोयाबीन, कापूस यांचे वाढते दर पहाता शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण दिसत असून आणखी भाव वाढ होईल व आपल्या मालाला अपेक्षित दर मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.