शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: ‘या’ अटीवर बीड जिल्ह्यातील जनावरांचे बाजार सुरू
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी काढले आदेश
लोकगर्जनान्यूज
बीड : लम्पी हा त्वचा रोगाच्या साथीमुळे जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. अखेर याबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी जनावरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे यांनी ( दि. २ ) मार्चला काढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजार सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी या त्वचा रोगाची साथ आल्यामुळे जनावरांचे बाजार पुर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे पशु पालकांचे मोठे नुकसान झाले. सध्या लम्पीची साथ आटोक्यात आल्याने जनावरांचे आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच बीड पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण 100 टक्के झाल्याचा अहवाल आणि जिल्ह्यातील साथ ही आटोक्यात आल्याने बीडच्या जिल्हाधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे यांनी जनावरांचे आठवडी बाजार सुरू करण्याचे आदेश ( दि. 2 ) काढले आहेत. यामुळे आता आठवडी बाजार सुरू होणार ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यासाठी मात्र जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना सोबत ठेवणं बंधनकारक आहे.