शेतकऱ्यांनो सावधान! केज तालुक्यातही काही ठिकाणी सोयाबीनवर मोझॅकचा अटॅक
लोकगर्जना न्यूज
केज : सोयाबीन पिकावर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे वृत्त असून, केज तालुक्यातील काही गावांमध्ये याचा पिकावर अटॅक दिसून आला आहे. यास कृषी कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे याचा प्रादुर्भाव वाढण्याआधी उपाययोजना करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
मागील दोन वर्षांपासून सोयाबीनचा पेरा वाढला असल्यामुळे हे प्रमुख पीक ठरत आहे. परंतु मागे यावर गोगलगायचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्न करत गोगलगायच्या संकटातून पीक वाचविले परंतु आता विषाणूजन्य मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे अनेक ठिकाणांहून समोर येत आहे. या रोगाचा सर्वाधिक फटका लातूर जिल्ह्याला बसल्याचे दिसून येत आहे. मोझॅकचा आपल्याकडे प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कृषी मंडळ अधिकारी, आडस कार्यालयाचे सुपरवायझर रविकांत ठोंबरे यांनी होळ,मुलेगाव, पळसखेडा, दिपेवडगाव या भागात प्रत्येक्ष बांधावर जाऊन सोयाबीन पाहाणी केली. यामध्ये त्यांना तुरळक ठिकाणी पिकांवर मोझॅकचा अटॅक दिसून आला. याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे सांगितले आहे. मोझॅक या रोगामुळे सोयाबीनचे पाने पिवळी पडतात, वाढ खुंटते, शेंगा कमी लागून उत्पादन घटते, पाने सुरकतून ओबडधोबड दिसतात. अशी लक्षणं आहेत. याचा प्रादुर्भाव जास्त नाही परंतु ते वाढण्याधी शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून असे दिसून येताच माहिती घेऊन उपाययोजना करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
* उपाययोजना काय?
मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर शेतकऱ्यांनी मायक्रोल ( आरसीएफ ), चिलमिक्स combi ( पुर्वा केमीकल्स ), किसाईट G( रानडे) यापैकी एक कोणतेही सुक्षम अन्नद्रव्य युक्त मिश्र खत १० मि.ली. अथवा १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी सकाळी ९ पुर्वी अथवा सायंकाळी ४ ते साडेसहा वाजण्याच्या आत करावे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे पिकात फिरुन मोझॅक रोगाची लक्षणे दिसणारे सर्व झाडे उपटून ती जाळून नष्ट करावीत.
रविकांत ठोंबरे
कृषी मंडळ अधिकारी, आडस कार्यालयाचे सुपरवायझर