शेतकऱ्यांनो खत,बी-बियाणे संबंधि ‘या’ व्हाट्सअप नंबरवर करा तक्रार
लोकगर्जनान्यूज
खत,बी-बियाणे विषयी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. याची ओरड मंत्रालया पर्यंत गेल्याने शेतकऱ्यांना याप्रकरणी तक्रार करता यावी यासाठी एक व्हॉट्सॲप नंबर सुरू करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. अखेर तो नंबर आज जाहीर करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या कृषी दुकानदारांना चाप बसणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
बोगस बियाणे, खते विक्री केली जात असल्याने पेरणी नंतर ते उगवतं नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच खत विक्री मध्ये जबरदस्तीने दुसरे कोणतेही खत घेण्यास सांगितले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना गरज नसताना काही खत खरेदी करावी लागत असल्याने यामुळे आर्थिक फटका बसतो आहे. आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी पेरणी वेळी व्याजाने अथवा घरातील दागदागिने विकून पैसा उभा करतो. त्यात अशी लूट होते. या प्रकरणी मोठी ओरड झाली. याचा आवाज पार मंत्रालयापर्यंत गेला. याची गंभीर दखल कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी घेतली. बैठक आयोजित करुन शेतकऱ्यांना खत,बी-बियाणे, किटकनाशके याबाबत तक्रार करता यावी यासाठी एक व्हॉट्सॲप नंबर सुरू करण्यात येईल असे म्हटले होते. तो व्हाट्सअप नंबर आज जाहीर करण्यात आला. यामुळे आता शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व लूट थांबेल असा अंदाज लावला जातो आहे.
तक्रार कशी करायची व नंबर कोणता?
खते,बी-बियाणे विक्री करणारे दुकानदार जर विशिष्ट कंपनीची घ्या अशी सक्ती करत असतील, अथवा चढ्या भावाने ती विक्री केली जात असतील तर शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी +91 9822446655 या व्हाट्सअप क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तक्रारदार शेतकऱ्यांचे नाव गुप्त रहाणार
अनेकवेळा लुबाडणूक व फसवणूक झाली तरी तक्रार केली अन् आपलं नाव समोर आले तर अडचण होईल. दुकानदार उदार देणार नाही, अथवा आपण सामान्य माणूस असल्याने कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. पण या +91 9822446655 व्हाट्सअप क्रमांकावर तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचा विश्वास कृषी मंत्रालयाने दिला.
तात्काळ कारवाई
पुराव्यानिशी तक्रार असेल तर संबंधित अधिकारी त्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित कृषी विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करतील असेही सांगितले जात आहे.