शेतकऱ्यांचे 18 लाख घेऊन पळून जाणारा भामटा केज मध्ये पकडला

लोकगर्जनान्यूज
केज : शेतकऱ्यांचे हक्काचे लाखो रुपये परस्पर उचलून पसार होणारा भामटा केज पोलीसांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला आहे. परंडा ( जि. उस्मानाबाद ) येथून तो खाजगी वाहनाने पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु केजमध्ये स्थानिक पोलीस व परंडा पोलीसांनी मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले आहे.
परंडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली प्रधान मंत्री किसान योजनेतील रक्कम परस्पर उचलून शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात आरोपी अजय दत्तात्रय चौरे याच्या विरुद्ध ( दि. ११ ) फसवणूक सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी खाजगी वाहनाने पसार झाला. आरोपी रक्कम घेऊन परभणीकडे जात असल्याची पोलीस पथकाला माहिती मिळाली. उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याशी संपर्क साधून प्रकार कळविला.पंकज कुमावत यांनी तात्काळ केज पोलीस ठाण्याचे डी बी पथकास परंडा पोलीसांना मदत करण्याचे आदेश दिले. केज व परंडा पोलीसांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपी अजय चौरे यास ( दि. १२ ) दुपारी ४ च्या सुमारास केज येथील वकील वाडीतील घरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुसळे, केज पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक दिलीप गित्ते, शमीम पाशा यांनी सदरील कारवाई केली.
शेतकऱ्यांचे 18 लाख ताब्यात
आरोपीच्या मुसक्या आवळताच झडती घेऊन त्यांने उचलले 18 लाख रुपये पोलीसांनी ताब्यात घेतले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले असल्याने पोलीसांचे आभार मानले जात आहे.
आरोपीला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
शेतकऱ्यांची रक्कम उचलून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडल्यानंतर त्यास पोलीसांनी कोर्टात हजर केले. मा. कोर्टाने आरोपीला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.