शेतकरी म्हणतोय तुमची पेरणी अन् मंत्री पदाची शपथ घेऊन पीकही उगवल पण आम्ही ताटकळलेलेच
सततच्या पावसाची नुकसानभरपाई नेमकी कधी मिळणार?

लोकगर्जनान्यूज
सध्याच्या राजकीय घडामोडींवर अनेकजण आपल्या परीने व्यक्त होत आहेत. परंतु जून महिना संपला तरी अनेक भागात पेरणी योग्य पाऊस नाही. शासनाने सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५०० कोटीची मदत जाहीर केली परंतु अद्याप फुटकी कवडीही मिळाली. हे सत्तेचा खेळ पहाता तुमची पेरणी झाली, मंत्री पदाची शपथ घेऊन पीकही उगवल आता फक्त कापणी बाकी! परंतु आम्हाला मदतही मिळाली नाही त्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने आम्ही ताटकळलेलेच असून आमची पेरणी कधीं होणार? असा प्रश्न उपस्थित केला.
हिंदुत्व, विकास, शेतकरी हिताचे, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी म्हणत या पाच वर्षांत महाराष्ट्राने तोडमोड सरकार पाहिले. यातून ना कोणी हिंदुत्ववादी ना कोणी सेक्युलर हे फक्त संधी साधू हे सर्व पक्ष आणि पुढाऱ्यांनी कृतीतून दाखवून दिले. याची सुरुवात फडणवीस व बारक्या पवारांनी पहाटेचा शपथविधी घेऊन केली हा महाराष्ट्राला एक धक्काच होता. असाच धक्का नव्हे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून सुनामी आणली अन् ती भाजपा सोबत सत्तेत समाऊन शांत झाली. घरात बसणारे नाही तर जनतेच्या सेवेतील व गतिमान सरकारच्या आरोळ्या दिल्या अन् सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देण्याची चार वेळा घोषणा केली पण ती अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. ती कधी मिळणार म्हणून निर्णयात गतिमान असणारे सरकार कृतीत गतिमान कधी होणार म्हणून विचारत आहेत. काही रेट कार्डच्या चर्चांनी यांची पीक कापणी सुरू दिसतेय? याच गुत्यात ( दारुच्या नाही काहीजण मिळून काम अंगावर घेतात त्याला गुत्ता म्हणतात ) आणखी एक टोळी सहभागी झाली. त्यांची पेरणी कधीं झाली हे कोणाला माहिती नाही परंतु २ तारखेला शपथ सोहळा पार पडल्याने पीक उगवल्याचे महाराष्ट्राच्या नजरेस पडले. या पिकला, पेरणीला कोणतीच अडचण नसून, वर्षाचे बारा महिने सुगीचे दिवस आहेत. यांचे अपसात विचार भिन्न असले, कितीही डोकं फुटाफुटी झाली तरी स्वतःच्या हितासाठी अथवा पीक कापणी व खळ्यासाठी हे सर्व एकत्र येतात. परंतु यांना खुर्चीवर बसवणारा शेतकरी नेहमीच अडचणीत सापडलेला असतो. आताच काहीजण पेरणी उरकून पीकही उगवल असल्याने कापणीच्या तयारीत आहेत. पण हा माती कसणारा शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. जून महिना संपला पण काळ्या आईची ओटी रिकामी असल्याने तो चिंतेत आहे. पाऊस वेळेवर पडत नसल्याने तो सध्या पेरणीसाठी व घोषित झालेल्या सततच्या पावसाच्या नुकसान भरपाईसाठी ताटकळलेला असून त्याच्याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही.