शेतकरी अन् सभासदांच्या मालकीची संस्था टिकली पाहिजे -रमेश आडसकर
संचालकांचा आडस ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार संपन्न
लोकगर्जनान्यूज
केज : शेतकरी, सभासद यांच्या मालकीचा साखर कारखाना टिकला पाहिजे. हा दृष्टिकोन समोर ठेवून अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला अन् त्यास सर्वांनी सहकार्य केल्याने यश आले असल्याचे प्रतिपादन रमेश आडसकर यांनी शनिवार (दि.१७) आडस येथे आयोजित नागरी सत्कार समारंभात बोलताना केले.
बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेला साखर कारखाना अडचणीत आहे. यातून मार्ग काढत तो शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू ठेवण्यासाठी प्रथम प्राधान्य असून, सध्या निवडणूक खर्च परवडणारा नाही. शेतकरी व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून राजकारण व समाजकारण करण्याची आडसकर कुटुंबाची परंपरा आहे. सभासद , शेतकऱ्यांच्या मालकीची ही संस्था टिकली पाहिजे म्हणून राजकीय मतभेद बाजूला ठेवून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या सहकार्याने यात यशही आलं. तालुक्यातील विविध संस्थांवर आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना न्याय दिला आहे. त्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी व सामान्य जनतेची प्रामाणिकपणे कामे करून त्यांना दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन भाजपा नेते रमेश आडसकर यांने केले. ते आडस सेवा सहकारी सो. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आडसचे भूमिपुत्र रमेश आडसकर, ऋषिकेश आडसकर यांच्यासह साखर कारखान्याचे बिनविरोध निवडून आलेले संचालक, केज व धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती तसेच संचालक मंडळाचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, उपसभापती डॉ. वसुदेव नेहरकर, महादेव तोंडे, धारूर बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, सुनील गलांडे, अरूण धपाटे, नेताजी शिंदे व दिलीप गुळभिले उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उद्धवराव इंगोले, माजी सरपंच बालासाहेब ढोले, उपसरपंच ओमकार आकुसकर, बाळासाहेब देशमुख, माजी सरपंच रमेश ढोले, विष्णू ढाणे, माजी उपसरपंच अंगद पाटील, गोविंद पाटील यांच्यासह सेवा सहकारी सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला होता. शेख इसाक यांनी सुत्रसंचलन व आभार मानले.