शिवसेनेकडून संगीता चव्हाण यांच्या कार्याची दखल राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी निवड
बीड : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी बीड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ॲड. संगीता चव्हाण यांची निवड करण्यात आली. या निवडीचे जिल्हाभरातून स्वागत करण्यात येत आहे. तर चव्हाण यांच्या कामाची ही पोचपावती असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
नुकतेच निवडीचे पत्र मिळाले असून संगीता चव्हाण यांच्या सह अन्य पाच जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. यात दीपिका संजय चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, आभा विजयकुमार पांडे, ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, उत्कर्षा रुपवते यांचा समावेश आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी आयोगाचे सदस्यपद अद्याप रिक्त होते. या रिक्त पदांवर सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका संजय चव्हाण, शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर, राष्ट्रवादीच्या आभा विजयकुमार पांडे, शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ॲड. संगीता चव्हाण, समाजसेविका ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया आणि काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते दादासाहेब रुपवते यांची कन्या समाजसेविका उत्कर्षा रुपवते यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.