शिवरुद्र आकुसकर यांच्या आंदोलनाची दखल; तहसील कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठकीचे आयोजन
पीक विमा व नुकसान भरपाई अनुदान साठी काढली होती आडस ते केज पायी दिंडी
लोकगर्जनान्यूज
केज : शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व विमा प्रश्नी वैयक्तिक तक्रारी अर्ज डोक्यावर घेऊन आडस येथील शिवरुद्र आकुसकर यांनी आडस ते केज पायी दिंडी काढून तहसीलदारांना अर्ज सादर केले. या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार यांनी शुक्रवारी ( दि. २४ ) विमा कंपनी प्रतिनिधी,कृषी अधिकारी आदिंची आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीला उपस्थित रहाण्याचे पत्र आकुसकर यांना मिळाले आहे.
अतिवृष्टीमुळे आडस व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तरीही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अनुदान मिळाले नाही तसेच हक्काचा पीक विमा कंपनीच्या जाचक अटीमुळे मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. या प्रश्नी शिवरुद्र आकुसकर यांनी शेतकऱ्यांचे वैयक्तिक तक्रार अर्ज जमा करून घेतले. हे हजारो अर्जांचा बोजा डोक्यावर घेऊन मागील महिन्यात ( दि. ११ ) आडस ते केज तहसील कार्यालय अशी पायी दिंडी काढून सदरील अर्ज तहसीलदार यांना सादर केले. या आंदोलनाची दखल घेऊन मा. तहसीलदार यांनी ( दि. २४ ) दुपारी ४ वाजता तहसील कार्यालयात बजाज अलियान्झ कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी सह आदि शिवरुद्र आकुसकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीला उपस्थित रहाण्याचे पत्र आकुसकर यांना मिळाले आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.