शाळेत घुसून ग्रामस्थांकडून शिक्षकास मारहाण
लोकगर्जना न्यूज
केज : तालुक्यातील जिवाची वाडी येथील वस्ती शाळेच्या मुख्याध्यापकाला शाळेच्या शेजारी असलेल्या ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गोकुळ सखाराम सारुक असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते जिवाची वाडी येथील हनुमान वस्ती शाळेवर कार्यरत असून, मुख्याध्यापक ही असल्याचे समजते. तसेच या वस्ती शाळेसाठी गोकुळ सारुक यांच्या वडीलांनी जागा दिलेली आहे. परंतु शाळेकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे गोकुळ सारुक यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदनाद्वारे शाळेसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पण या रस्त्याला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. परंतु सारुक यांचा पाठपुरावा सुरुच असल्याने तहसीलदार यांनी सुनावणीसाठी सर्वांनाच बोलावलं होतं, तर तहसीलदार यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पहाणीही केली. यामुळे आपल्याच शेतातून रस्ता जातो म्हणून या रागातून शाळेत घुसून सहा जणांनी रस्त्याची मागणी का करतो म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली व पळून गेल्याचे अनर्थ टळला असल्याची तक्रार गोकुळ सारुक यांनी केली. त्यावरून केज पोलीस ठाण्यात गोकुळ संभाजी चौरे, केशव संभाजी चौरे, श्रीहरी जोतीराम चौरे, मच्छिंद्र महादेव चौरे, कृष्णा मधुकर चौरे, आसाराम जोतीराम चौरे सर्व रा. जिवाचीवाडी ( ता. केज ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास केज पोलीस करत आहेत.