शाब्बास रे पट्यांनो! आडसच्या ट्रेकिंग ग्रुपने वाचवले एक प्राण
येथील काही निसर्गप्रेमी प्रत्येक रविवारी धारुर, अंबाजोगाई येथे डोंगर ट्रेकिंग साठी जातात. यामुळे त्यांची ट्रेकिंग ग्रुप अशी ओळख बनली आहे. ते स्वतः च्या आनंदासाठी करतात परंतु आज त्यांनी गाळात फसलेल्या गायीचे प्राण वाचवले आहे. शेतकऱ्याच मोठ नुकसान टळले असून गायीचा शोध घेत असलेल्या शेतकऱ्याला त्याची गाय पाहून आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्यामुळे मुक्या जीवाचे प्राण वाचले तसेच शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पहाता आलं याच समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया या ग्रुपने व्यक्त केली.
नेहमीप्रमाणे दर रविवारी आडस ट्रेकर्स ग्रुप आज ट्रेकिंग व पर्यटनासाठी धारूर च्या बालाघाट डोंगर रांगेच्या अंबाचोंडी मंदिर परिसरात गेलेले होते. यावेळी डोंगरावरून या ग्रुपला नदीमध्ये गाळात प्राणी फसलेला दिसून आलं. खाली येऊन पाहिले असता एक गाय गळात पुर्णपणे फसलेली दिसली. तिचे समोरील पाय तर पुर्ण गाळात होते. फक्त मान वर होती. त्यामुळे गायीला हलता ही येत नव्हते. काल संध्याकाळी पासून फसल्याने आणि कडाक्याची थंडी यामुळे गाय गारठून गेल्यामुळे तिच्या शरिरात त्राण उरले नव्हते. गायीला तर वाचवायचे त्यासाठी अगोदर गाळ उपसून काढणं आवश्यक आहे. परंतु त्यासाठी यांच्याकडे ना टोपली ना खोरं मग सर्वांनी हाताने गाळ काढण्यास सुरुवात केली. पुर्ण गाळ उपसून गायीचे फसलेले पाय मोकळे केले. परंतु कालपासून गाय फसलेली असल्याने ती चालण्या ऐवजी जागेवर कोसळली, मग तिला संतोष चवार, सतीश आढाव, आकाश कोटे, नकुल इंगोले, उदय इंगोले, प्रथमेश इंगोले, आदित्य चवार, चैतन्य आढाव या ट्रेकिंग ग्रुपने ढकलून गाळाच्या बाहेर काढलं. त्याच्या शरिराला दाबून गोठलेल्या रक्तपुरवठा सुरळीत झालं. पाणी पाजून बाजुचे गवत आणून खायला घातले. काही वेळातच ती स्वतःच्या पायांवर उभी राहून चालायला लागली. गाय चालताना पाहून आम्ही आजपर्यंत सर्वोच्च आनंद अनुभवला. गाय सोबत चालू लागली. तेव्हा रात्रीपासून गायीचा शोध घेत शेतकरी त्यांच्या जवळ आला. गायीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याला सर्व हकीगत सांगितली असता शेतकऱ्याने सर्वांचे आभार मानले. हे एक चांगले पुण्यकर्म घडेल याच समाधान असल्याचे मत व्यक्त केले. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली असता या ग्रुपचे अभिनंदन करण्यात येत असून प्रत्येक जण शाब्बास रे पट्यांनो म्हणून कौतुक करत आहेत.