बीड (प्रतिनिधी)
दि.8 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दलित आणि मुस्लिम समाजाचे कैवारी नसून दोन्ही समाजविरोधी असल्याचा आरोप माजी नगरसेवक शेख शफीक, अन्वर पाशा यांनी पत्रकातून केला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत दलित मुस्लिम समाजाने न सांगता शरद पवारांच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले आणि आज विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या 82 उमेदवारांमध्ये मुस्लिम समाजाचे फक्त 02 उमेदवार देण्यात आले आहेत. हा एक प्रकारे मुस्लिम समाजावर अन्याय आहे. आणि हे जे 02 उमेदवार दिले गेले आहेत, ते जिथून निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी न देता जिथे निवडून येऊ शकत नाहीत अशा ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तसेच बीड विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाचा हक्क असताना येथे निष्क्रिय उमेदवार देण्यात आला आहे. यांनी आपल्या पाच वर्षाच्या कालखंडात कसलाच विकास केलेला नाही म्हणून अशा निष्क्रिय उमेदवारामुळे महाविकास आघाडीची बीड विधानसभेची जागा पडण्यातच जमा आहे. तसेच आष्टी मतदार संघात मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली गेली असल्याने येथे ही महाविकास आघाडीची जागा धोक्यात आली आहे. अशाप्रकारे पवार साहेबांनी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे जनतेत रोष पहावयास मिळत आहे. दोन्ही ठिकाणी जनता महाविकास आघाडीचे उमेदवार यांना पाडणार असल्याचे देखील माजी नगरसेवक शेख शफिक, अन्वर पाशा यांनी पत्रकातून केले आहे.