वृक्ष लागवड व संवर्धन करणाऱ्या इयत्ता १०-१२ च्या विद्यार्थ्यांना गुणदान: आमदार नमिता मुंदडांचा प्रस्ताव
लोकगर्जनान्यूज
केज : वृक्ष लागवड व संवर्धन करणाऱ्या इयत्ता १० आणि १२ च्या विद्यार्थ्यांना गुणदान योजना चालू करावी अशी पर्यावरण व जनहिताची मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे. याबाबत वन विभागाचे अभिप्राय आले असून हा प्रस्ताव मान्यतेच्या दिशेने असल्याने दिसून येत आहे. हा निर्णय झाला तर महाराष्ट्रात वृक्षक्रांती होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शिक्षण विभागाने इयत्ता १० व १२ परिक्षेत विद्यार्थ्यांसाठी शाश्वत वृक्ष लागवड व संवर्धनासाठी ३ व ७ गुणदान योजना सुरू करावी. यातून एक रुपया खर्च न करता लाखो वृक्षांची लागवड होईल, यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होईल. असा प्रस्ताव आमदार नमिता मुंदडा यांनी राज्याच्या परिक्षा समिती समोर मांडण्यात आला. यावर चर्चा करुन यावर तपशीलवार माहिती वन विभागाकडून घेण्यात यावी व ती पुढील बैठकीत समिती समोर मांडण्याचा निर्णय घेऊन वन विभागाला याबाबत पत्र पाठविण्यात आले. वन विभागाकडून याबाबत अभिप्राय आला. वृक्ष लागवड व संवर्धन गुणदान योजना ग्रामीण/ शहरी भागात विभागणी करुन राबविण्यात यावी, ग्रामीण मुलांना वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल पण शहरी भागात अडचणीचे ठरु शकते. ग्रामीण विद्यार्थ्यांना लागवड यशस्वी केलेल्या वृक्ष संखे नुसार गुणदान करावं, यासाठी इयत्ता १० च्या विद्यार्थ्यांसाठी ८ पासून तर १२ विद्यार्थ्यांसाठी ११ पासून केलेली यशस्वी लागवड रोप संख्या असे निकष असावा. तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हवेरियम तयार करणे, पर्यावरणविषयक जागृती, निबंध लेखन, चित्रकला या उपक्रमांद्वारे गुणदान करावं. केवळ रोप लावून उद्देश साध्य होणार नाही त्यासाठी संवर्धन आवश्यक असून शैक्षणिक संस्थेने कारवाई करावी. या उपक्रमाचे क्षेत्रिय मुल्यमापन व तपासणी वन विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने शक्य होणार नाही. त्यामुळे यांचे मुल्यमापन व तपासणी शिक्षण विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून करुन घ्यावी. या आशयाचा अहवाल वन विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांना पाठवला आहे. अशी माहिती आमदार नमिता मुंदडा यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. यावर शिक्षण मंडळ काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे. आमदार मुंदडा यांचा हा प्रस्ताव पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.