वीज गेली की, आडसमध्ये बीएसएनएल आउट ऑफ कव्हरेज
वीज गेली की, आडसमध्ये बीएसएनएल आउट ऑफ कव्हरेज
आडस : येथील बीएसएनएल एक्सचेंज कार्यालयात बॅटरी नसल्याने वीजपुरवठा बंद होताच रेंज जात आहे. त्यामुळे येथील बीएसएनएल ग्राहक वैतागून गेले आहेत. वर्षभरापासून हीच अवस्था असून खाजगी टेलिफोन कंपनी चांगली सेवा देण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. परंतु शासकीय कंपनी असूनही हे वर्ष-वर्ष सेवा बंद पडत आहे तरी, हातावर हात ठेवून आहेत. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
टेलिफोन सेवा ही आता केवळ संपर्काचे साधन नाही तर, इंटरनेटमुळे जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. स्मार्टफोनमुळे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या अफाट वाढली, हे पहाता खाजगी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेवा देण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. तसेच ४ जी नेटवर्कला आता ५ जी करण्याची तयारी सुरू आहे. चांगली सेवा देऊन ग्राहकांना टिकवून ठेवत आहेत. या तुलनेत सरकारी टेलिफोन कंपनी असलेली बीएसएनएल कुठे आहे? असा प्रश्न आडस येथील सेवा पाहून उपस्थित केला जात आहे. येथील बीएसएनएल कार्यालयातील बॅटऱ्या वर्ष उलटून गेले खराब झालेल्या आहेत. यामुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला की, बीएसएनएलची सेवा पुर्णपणे बंद पडते. यामुळे पैसे भरून या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. येथे अनेक ब्रॉडबँड इंटरनेट वापरणारे ही ग्राहक आहेत. त्यांचेही बीएसएनएलची सेवा बंद पडली की, काम बंद पडत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केला तर ते मार्च पर्यंत सेवा सुरळीत होईल असे सांगत आहेत. वर्ष झाले तरी, सरकारी कंपनीला मार्चची वाट पाहावी लागते तर, ही कंपनी खाजगी कंपन्यांच्या मुकाबल्यात ग्राहक कसं टिकून ठेवणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
चार महिन्यांपूर्वी तुटलेलं वायर जोडण्यासाठी वेळ नाही!
येथील महाराणा प्रताप चौकात बीएसएनएलचे लॅंडलाइन व ब्रॉडबँड कनेक्शनचे केबल ( वायर ) चार महिन्यांपूर्वी तुटलेलं आहे. यामुळे काही मल्टीस्टेट संस्थेचे तसेच काही ऑनलाईन व्यसायिकांचे ब्रॉडबँड कनेक्शन बंद आहेत. ते ना विलाजाने दुसऱ्या कंपनीचे इंटरनेट वापरत आहेत. केवळ वायर न जोडल्याने हे नियमित असलेल्या ग्राहकांना बीएसएनएल कंपनीच्या हलगर्जी कारभारामुळे दुसऱ्या कंपनीकडे जावं लागतं. त्यामुळे यावर कोणाचे अंकुश असते की, नाही? असे विचारले जात आहे.