वीज कोसळून एक ठार तिघे जखमी:केज तालुक्यातील घटना
लोकगर्जना न्यूज
केज : तालुक्यात आज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून यावेळी वीज कोसळून एक जण ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना काळेगाव घाट ( ता.केज ) येथे घडली आहे.
मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाळत असलेली पिकं पाहून शेतकरी चातका सारखी पावसाची वाट पाहत आहे. दरम्यान आज बुधवारी ( दि. ३१ ) सायंकाळच्या सुमारास केज तालुक्यात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले. हलक्या सरी कोसळल्या असून यावेळी विजेचा कडकडाट होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात असलेले काळेगाव घाट येथील काही जणांवर अचानक वीज कोसळली यामध्ये शीला रामरत्न आगे या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर आत्माराम माणिक आगे, अन्नपूर्णा आत्माराम आगे, रामरत्न चंद्रकांत आगे हे जखमी झाले. या घटनेने काळेगाव घाट गावावर शोककळा पसरली आहे.