विवाहितेची गळफास; हत्येचा आरोप करत माहेरकडील मंडळीचा ठिय्या आंदोलन
लोकगर्जना न्यूज
गेवराई : तालुक्यात विवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत स्वतःच्या शेतात मृतदेह आढळून आला. याबाबतीत माहेरकडील मंडळीने ही हत्या असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत उमापूर येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन दिवसांपूर्वीच मयत महिलेच्या पतीने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे सांगितले जात आहे.
अंजली सुनील राठोड रा. नृसिंहतांडा ( ता. गेवराई ) असे मयत महिलेचे नाव आहे. रविवारी ( दि.३१ ) सायंकाळी अंजली यांचा स्वतः च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला असल्याने आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगितले जात होते. परंतु माहेर कडील मंडळीने आमच्या मुलीला त्रास होता. ही हत्या असून आत्महत्येचा बनाव केला असल्याचा आरोप केला. माहेर कडील मंडळींवर गुन्हे दाखल करा म्हणत उमापूर येथे गेवराई-शेगाव रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत रस्ता रोखला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांना कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.