कृषी

विमा प्रश्न पेटला! आडस येथे शेतकऱ्यांचा चक्का जाम

दीड तास वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या रांगा

लोकगर्जना न्यूज

केज : नुकसान झालेले असतानाही विमा कंपनी २५ % ॲग्रीम देण्यास नकार देत आहे. ४७ पैकी अवघ्या २० महसूल मंडळातील शेतकऱ्यांनाच २५ % ॲग्रीम मिळणार आहे. यामुळे आडस ( ता. केज ) येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोमवारी ( दि. २६ ) आडस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना व मनसे यांच्या नेतृत्वाखाली सरसकट विमा ॲग्रीम द्यावं यासाठी चक्का जाम आंदोलन केले.

ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने खरीपाची पिके करपून गेली. हलक्या जमिनीवरील पिकांचा खराटा झाला. सोयाबीनला फुले लागण्याच्या महत्त्वाच्या काळातच पाऊस पडला नाही. त्यामुळे फुले गळून गेली. यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यानंतर जिल्हाधिकारी यांनी नुकसानीचे रँडम सर्वे करण्याचे आदेश दिले. हे सर्वे ही झाले. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कडून २५ % विमा ॲग्रीम साठी तीन अधिसूचना काढण्यात आल्या. यामध्ये प्रथम १६ महसूल मंडळ, दुसरी १० आणि तिसरी २१ असे एकूण ४७ महसूल मंडळासाठी अधिसूचना होती. परंतु विमा कंपनीला हा सर्वेच मान्य नाही. यातील केवळ २० महसूल मंडळांना २५% विमा ॲग्रीम देण्याची तयारी दाखवत २७ महसूल मंडळ विमा कंपनीने वगळले आहेत. नुकसान झालेले असतानाही कृषी विमा कंपनी हेकेखोर पणा करत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी सरसकट २५ % ॲग्रीम द्यावं यांसह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वाखाली आडस ( ता. केज ) येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी ( दि. २६ ) सकाळी ९ ते १०:३० या वेळेत चक्का जाम आंदोलन केले. सकाळची वेळ असल्याने तब्बल दीड तास रस्ता बंद असल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर प्रवाशांना अडकून पडावे लागल्याने अनेकांची गैर सोय झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे, मनसेचे सुमंत धस, प्रमोद पांचाळ, फेरोज पठाण, कल्याण केदार, सुग्रीव करपे, मनोहर गाडे, नारायण काकडे, आडसचे सरपंच बालासाहेब ढोले, उपसरपंच ओमकार आकुसकर, शिवरुद्र आकुसकर, बाळासाहेब देशमुख, नितीन ठाकुर, सागर ठाकुर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांच्या मागणीचे निवेदन मंडळ अधिकारी एस.एस. तांबारे, प्र. कृषी मंडळ अधिकारी रविकांत ठोंबरे, कृषी सहायक भाग्यश्री पतंगे, तलाठी सी. डी. कांबळे यांनी स्विकारले. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »