विद्युत तार तुटून आगीची घटना घडताच महावितरण कंपनीला जाग
मोहमदिया कॉलनीत चार पोल बसवून तारातील अंतर केले कमी
बीड : शहरातील मोहमदिया कॉलनीत गुरुवारी ३३ केव्हीची विद्युत तार तुटून चार घरांना आग लागल्याची घटना घडली. यानंतर महावितरण कंपनीला जाग आली असून आज शुक्रवारी नवीन चार पोल ( खांब ) बसवून तारांचे अंतर कमी केले. यामुळे या भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
तेलगाव रस्त्यावरील मोहमदिया कॉलनी मधून ३३ के.व्ही ची विद्युत वाहिनी ( तार ) जाते. उच्च दाबाने वीज पुरवठा होत असल्याने या तारा लोंबकळत होत्या. या तारा बदलण्यात याव्यात अथवा मानवी वस्ती असल्यामुळे ते दुसरीकडून लाईन टाकण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. परंतु महावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत होती. गुरुवारी ( दि. ३ ) लोंबकळत असलेल्या तारांचे घर्षण होऊन एक तार तुटून घरांवर पडली. यामुळे चार घरांना आग लागल्याची घटना घडली. नागरिकांच्या जागरुक्तेमुळे मोठी हानी टळली. परंतु यातील एका व्यक्तीचे जास्त नुकसान झाले. यानंतर महावितरण कंपनीचे उमेश कसबे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आज शुक्रवारी ( दि. ४ ) याभागात चार नवीन पोल बसवले आहेत. पोल जवळ जवळ झाल्याने तारांना ताण बसला असून, अंतर कमी झाल्याने अपघाताची शक्यता टळू शकते त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.