विघ्न पाठ सोडेना! अहमदनगर-आष्टी रेल्वेला आग
लोकगर्जनान्यूज
बीड : अहमदनगर ते आष्टी सुरु असलेल्या रेल्वेला आज आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन डब्बे जळून खाक झाल्याचे वृत्त असून गर्दी कमी असल्याने प्रवाशांनी उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी अग्नीशामक दल, पोलीस व रेल्वे कर्मचारी पोचले आहेत.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वेचे काम पुर्ण झाले नाही. परंतु अहमदनगर ते आष्टी पर्यंतचे काम पुर्ण झाल्यामुळे रेल्वे सुरू करण्यात आली. सुरवातीला दोन रेल्वे सुरू करण्यात आलेल्या होत्या पण प्रवाशांची तुरळक संख्या पहाता सध्या एकच रेल्वे सुरू आहे. तीही मध्यंतरी विद्युत वाहिनीचे काय करण्यासाठी बंद होती. ती आता कशीबशी सुरू झाली तर आज सोमवारी ( दि. १६ ) दुपारी अचानक दोन डब्यांना आग लागली. ती वाढत चार ते पाच डब्यापर्यंत गेली. यातील तीन डब्बे पुर्ण खाक झाले असल्याने रेल्वेचे मोठे नुकसान झाले. प्रवासी संख्या कमी असल्याने सर्व प्रवासी तातडीने उतरण्यात यशस्वी झाले म्हणून कोणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्यांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी पोलीस, रेल्वेचे कर्मचारी दाखल झाले. ४ वाजता आग विझविण्यात यश आले. अहमदनगर-आष्टी रेल्वे सुरू झाल्यापासून काहींना काही कारणाने चर्चेत असल्याने विघ्न काही पाठ सोडत नाही. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आग नेमकी का लागली? याचा पोलीस व रेल्वे कर्मचारी शोध घेत आहेत.