विकृती! विषारी द्रव्ये टाकून शिजवलेलं अन्न गायरानात पेरले: ते खाण्यात आल्याने १६ मेंढ्यांचा तडफडून मृत्यू
डॉ. सुदर्शन मुंडेंच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
लोकगर्जना न्यूज
घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे आज सकाळी मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. माहिती मिळताच डॉक्टर सुदर्शन मुंडे यांनी दोन सहकारी डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह धाव घेत उपचार सुरू केले. मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असता विषबाधा झाल्याचे लक्षात आले. यानंतर मेंढ्या चारत असलेल्या व्यक्तीने गवतामध्ये ठिकठिकाणी शिजवलेलं भाकरीचे तुकडे, कनिक ठेवलेलं असल्याचे सांगितले ते खाल्यामुळे मेंढ्यांनी तडफडून जीव सोडला. त्यामुळे कोणीतरी विषारी द्रव्ये टाकून अन्न शिजवून गारानात टाकलं व मेंढ्यांचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्याचे ३ लाखांच्या जवळपास नुकसान झाले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील शेतकरी शंकर दगडु वैद्य हे शेती करत मेंढपाळ हा व्यवसाय करतात. आज सोमवारी ( दि. १० ) सकाळी मेंढ्या घेऊन ते दौंडवाडी रस्त्यावर असलेल्या शेताकडे चारण्यासाठी चालले होते. शेताच्या रस्त्यावरच गायरान आहे. या गायरानात गवत असल्याने मेंढ्या चरु लागल्या म्हणून ते थांबले. परंतु काही वेळातच मेंढ्या जमीनीवर पडून तडफडू लागल्या. पाहाणी केली असता शिजलेले अन्न व कणिक पेरल्या सारखे ठिकठिकाणी दिसून आले. तर काही ठिकाणी भाकरीचे तुकडे ही होते. हे कोणीतरी विषारी द्रव्ये टाकून अन्न टाकण्याचा खोडसाळपणा केल्याचे लक्षात आले. याची घाटनांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती दिली. माहिती मिळताच डॉ. सारिका जावळे यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली व उपचार सुरू केले. मेंढ्यांची संख्या जास्त असल्याने अंबाजोगाई पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन मुंडे यांना माहिती दिली. ते स्वतः आणि डॉ. बालासाहेब गायकवाड यांना व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. उपचार सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु तोपर्यंत १६ मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने घाटनांदूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच विषारी द्रव्ये मिसळून अन्न टाकणाऱ्या विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
* शेतकऱ्याचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान
तब्बल १६ मेंढ्याचा तडफडून मृत्यू झाला. यातील ७ मेंढ्या गाभण होत्या. बाजार भावाप्रमाणे विचार केला तर शेतकऱ्याचे तब्बल तीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी शेतीचे उत्पन्न घटलेले त्यात हा आघात यामुळे शेतकऱ्यासाठी दुष्काळात तेरावा महिना असा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
* २५ मेंढ्या उपचारा खाली
डॉ. सुदर्शन मुंडे, डॉ. सारिका जावळे, डॉ.बालासाहेब गायकवाड सह कर्मचाऱ्यांनी धाव घेत वेळीच उपचार सुरू केल्याने ४० मेंढ्यांना जिवदान मिळाले तर सध्या २५ मेंढ्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाचे कौतुक करण्यात येत आहे.